जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्या व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी डावलल्याचा आरोप करत जोरदार खडाजंगी झाली.
श्रीमती नागराजन यांनी आज माण तालुक्यातील महिमानगड, उकिर्डे, पिंगळी, बिदाल, बिजवडी, मोगराळे, पाचवड, अनभुलेवाडी, वावरहिरे, सोकासन या दहा गावांची पाहणी केली.
त्यानंतर झालेल्या बैठकीच्या सुरुवातीलाच सभापती विक्रम शिंगाडे यांनी आम्ही भेटी दिलेल्या ठिकाणी एकही टँकर आढळून आला नाही, तर दौऱ्यात समाविष्ट नसलेल्या; पण अचानक भेट दिलेल्या पांगरीत दूषित पाणी आढळून आले, असे सांगून पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जात नाही, असा आरोप केला.यावर बोलताना याशनी नागराजन यांनी जिथे जास्त टंचाई आहे तिथे भेटी द्यायचे आमचे नियोजन होते आणि हा दौरा अचानक ठरलेला होता, असे स्पष्ट केले, तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देताना सर्व विभागांनी समन्वयाने आणि क्षमतेने काम करण्याचे आवाहन केले.
त्यानंतर त्या बैठकीतून निघाल्या असता जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई यांनी संताप व्यक्त केला. ‘प्रशासकराज संपून लोकशाही सुरू झाली आहे हे अधिकाऱ्यांच्या अजून लक्षात येत नाही,’असा टोला लगावतानाच महंमद तुघलकी कारभार करणाऱ्या प्रशासनाचा निषेध करतो, अशी घोषणा दिली. पदाधिकारी आणि अधिकारी हे प्रशासनाची दोन महत्त्वाची अंग आहेत. आपण एकत्रित काम केले, तरच चांगले काम होईल, असेही अनिल देसाई म्हणाले.या बैठकीस सभापती विक्रम शिंगाडे, जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई, सोनाली पोळ, शीतल रणपिसे, उपसभापती प्रियांका जगदाळे, पंचायत समिती सदस्य बाळकृष्ण कदम, कल्पना वीरकर व गौरी तुपे, प्रभारी गटविकास अधिकारी चंद्रकांत खाडे, विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नागराजन यांनी आज केलेल्या पाणीटंचाई दौऱ्यावर प्रश्न उपस्थित केला जात असून, पदाधिकाऱ्यांना अंधारात ठेवून केलेला हा पाणीटंचाई दौरा, की दिखावा असा सवाल पदाधिकाऱ्यांनी केला. मात्र, या दौऱ्याबाबत पदाधिकारी अनभिज्ञ होते. पदाधिकाऱ्यांना दौऱ्यातून डावलल्याचे पडसाद त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत उमटले. त्यामुळे या बैठकीत मुख्याधिकाऱ्यांना सर्वांनी धारेवर धरले.











