April 24, 2026 3:17 pm

‘रिक्षा चालक गेले युपी-बिहारला! डोंबिवली, कल्याणकर लागले रांगेत ताटकळायला.’

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

शाळांचा सुट्ट्यांचा हंगाम सुरू झाला आहे. अनेक रिक्षा चालक आपल्या कुटुंबासह महाराष्ट्रातील विविध भागातील आपल्या मूळ गावी, काही उत्तरप्रदेश, बिहार आणि इतर राज्यांमध्ये निघून गेले आहेत.ही चालक मंडळी गावी गेल्याने कल्याण, डोंबिवली शहरात रिक्षांचा तुटवडा जाणवत आहे. त्याचा सर्वाधिक फटका दररोज कामावर जाणाऱ्या प्रवाशांना बसत आहे.

सकाळच्या वेळेत घराकडून डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकाकडे जाताना झटपट रिक्षा प्रवाशांना मिळतात. संध्याकाळी कामावरून परतल्यावर डोंबिवली, कल्याणमधील रिक्षा थांब्यांवर आणि बाहेरील रस्ते, चौक भागात उभ्या असणाऱ्या रिक्षाही प्रवाशांना प्रवासासाठी मिळत नाहीत.

रिक्षा वाहनतळांवर एक ते दीड किलोमीटरच्या रांगा लागतात. मागील काही दिवसांपासून हे दृश्य कल्याण, डोंबिवलीतील रिक्षा वाहनतळांवर दिसत आहे. रिक्षा वाहनतळांवर एक ते दीड तास उभे राहुनही रिक्षा मिळत नसल्याने प्रवासी त्रस्त आहेत. कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या बस डोंबिवली, कल्याणमध्ये ठराविक मार्गांवर धावतात. प्रवाशांची प्रवासासाठी सर्व बाजुने कोंडी होते.

लोकलमध्ये धक्केबुक्के खात मेटाकुटीला आलेला प्रवासी घामाने निथळत असतो. घरी कधी जातो यासाठी तो आतुर असतो. डोंबिवली पूर्व, पश्चिम रेल्वे स्थानक भागातील रिक्षा वाहनतळांवर हा प्रवासी गेला की त्यांना वाहनतळावर एकही रिक्षा प्रवासासाठी भेटत नाही. आपणास वाहनतळावर रिक्षा मिळेल या अपेक्षेने प्रवासी रिक्षा वाहनतळावर रांगेत उभे राहतात.

मागील काही दिवसांपासून दररोज डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील प्रवाशांची रांग डोंबिवली पूर्व रामनगर रेल्वे तिकीट खिडकीपासून ते रेल्वे जिन्यापर्यंत लागते. केळकर रस्त्यावर रिक्षा वाहनतळावरील रांग कैलास लस्सीपर्यंत, बाजीप्रभू चौकातील रांग फडके रस्त्यापर्यंत गेलेली असते. एक ते दीड तास रांगेत उभे राहुनही रिक्षा मिळत नसल्याने प्रवासी त्रस्त होत आहेत.

अनेक रिक्षा चालक रिकाम्या रिक्षा या ताटकळणाऱ्या प्रवाशांसमोरून सुसाट वेगाने नेतात. ते प्रवासी भाडे घेत नाहीत. प्रवासी वाट्टेल ते भाडे देण्यास तयार असतात. रिक्षा चालक आपल्या ताठ्यात राहून प्रवाशांकडे ढुंकुनही पाहत नाहीत. यामध्ये नोकरदार महिला वर्गांचे सर्वाधिक हाल होतात.

गेल्या तीन दिवसापूर्वी एक नागरिक आपल्या कुटुंबासह डोंबिवली रेल्वे स्थानक भागात एक तास रिक्षेची वाट पाहत होता. या नागरिकाच्या खांद्यावर लहान बाळ होते. हा प्रवासी प्रत्येक रिक्षा चालकाला भाड्यासाठी याचना करत होता. कोणीही रिक्षाचालक त्यांच्याकडील लहान बाळ पाहून दयाभाव आणून प्रवासी वाहतुकीसाठी सहकार्य करत नव्हते, यासंदर्भातची एक दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमांत प्रसारित केली. ही चित्रफित पाहून २४ तास वातानुकूलित सयंत्रात आराम करणाऱ्या एका माजी आमदाराने परिवहन मंत्र्यांनी याविषयाची दखल घ्यावी कळवून आपणास लोकांचा कळवळा आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.

आरटीओ अधिकाऱ्यांनी साध्या वेशात, खासगी वाहनातून जाऊन रिक्षांवर कारवाई करावी. आरटीओ वाहन आले की यामध्ये चुकार, अनियमितता असलेले रिक्षा चालक पळून जातात. रिक्षा वाहनतळांवरील सरळमार्गी सेवा देणारे रिक्षा चालक कारवाईच्या फेऱ्यात अडकतात. त्यामुळे हे प्रश्न निर्माण होत आहेत.

 

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!