परतवाडा येथील मुलींचे लैंगिक शोषण आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवल्याच्या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याला पोलिसांनी अटक केल्यानंतर, आज अचलपूर शहरात त्याची भररस्त्यातून धिंड काढण्यात आली.
यावेळी आरोपी अयानला धड चालताही येत नसल्याचं दिसून आलं. उतरेला चेहरा, मान खाली घालून लंगडत चालत असलेला अयान दिसला.
आरोपी अयान अहमद याला आज तपासाच्या निमित्ताने अचलपुरातील सरमसपुरा पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तपासाचा एक भाग आणि गुन्हेगारांच्या मनात भीती निर्माण व्हावी या उद्देशाने पोलिसांनी सरमसपुरा पोलीस ठाण्यापासून ते अयानच्या घरापर्यंत त्याला पायी चालत नेले असल्याची चर्चा रंगली आहे. पोलिसांनी यावर भाष्य केले नाही.
धिंड काढल्यानंतर पोलीस पथकाने अयानच्या अचलपूर येथील घराची कसून झाडाझडती घेतली. या झाडाझडतीमध्ये पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, आरोपीने वापरलेले इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स, मोबाईल आणि व्हिडिओ संदर्भातील इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे.
परतवाडा-अचलपूर शहरात या व्हिडिओ प्रकरणामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. आरोपी अयान अहमद याला कडक पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात आले असून, न्यायालयीन प्रक्रियेनुसार पुढील कारवाई केली जात आहे.
आरोपी अयानला सोशल मीडियावरील प्रसिद्धीचे जणू वेडच जडले होते. महागडे स्मार्टफोन बाळगणे, आलिशान हॉटेल्समध्ये पार्ट्या झोडणे आणि मुलींवर वारेमाप पैसे खर्च करणे हा त्याचा जणू छंदच होता. काही दिवसांपूर्वीच त्याचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तो हातात रोख नोटांची बंडले दिसली होती. त्याशिवाय, एका थारसोबत त्याने व्हिडीओ काढला. अयान आणि त्याच्या मित्रांमध्ये मुलींना आपल्या जाळ्यात ओढण्याची विकृत स्पर्धा लागली होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली होती. अयानचा मित्र उजेर यालाही पोलिसांनी अटक केली असून त्यानेदेखील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. अयाने मुलींचे शोषण केल्यानंतर पैशांसाठी त्या व्हिडीओची विक्री अॅडल्ट साइट अथवा इतर कुठे केलीय का, याचाही तपास होण्याची शक्यता आहे.











