April 23, 2026 4:52 pm

* जगबुडी नदीकिनारा अस्वच्छतेच्या विळख्यात

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

जगबुडी नदीकिनारी शासकीय जागेत मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या उभ्या राहिल्या असून, निसर्गसौंदर्य लाभलेल्या या नदीकिनाऱ्याला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. या किनाऱ्यावरच पालिकेचे मटणमार्केट असून, त्यातून निर्माण होणारा ओला व सुका कचरा येथेच फेकला जातो.

याबाबत पालिका प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत आहे.

मच्छीमार्केट इमारत उपलब्ध असतानाही बंदरमार्गाच्या दुतर्फा दररोज मासळी बाजार भरत असून, या मार्गाने ये-जा करणाऱ्या पादचारी व वाहनचालकांना अडथळा शर्यत पार करावी लागते. जगबुडी किनाऱ्यावर अस्वच्छता, आरोग्यासाठी हानिकारक कचरा, अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यांचा वाढता विळखा चिंतेची बाब आहे.

जगबुडी नदीवरील भोस्ते पुलालगत पालिकेने गणेश विसर्जन घाट व प्रेक्षक गॅलरी लाखो रुपये खर्च करून उभारून किनाऱ्याचे सुशोभीकरण केले आहे; मात्र या गणेशघाटापासून अवघ्या काही फूट अंतरावर असलेल्या अनधिकृत झोपडपट्ट्या व त्यामधून बाहेर पडून उघड्यावर शौचास बसणारे समाजकंटक या कारभाऱ्यांना दिसून येत नाहीत, याचे आश्चर्य वाटते.

स्वच्छता अभियान राबविताना केवळ काही दिवसांकरिता दाखविलेला सुज्ञपणा प्रशासन व नागरिकांनीदेखील सोडून दिल्याचे निदर्शनास येत आहे. नदीकाठी पडलेला कचरा याची साक्ष देत आहे. पालिका प्रशासनाने मच्छी-मटणमार्केट उभारण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत; मात्र त्या इमारतीत मासे विक्रेत्यांना बसविण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरले आहे.

त्यामुळे बंदरमार्गाच्या दुतर्फा उघड्या व सार्वजनिक जागेत मासळी विक्री सुरू असल्याचे दिसून येते. मासळी खरेदीसाठी येथे येणारे याच मार्गाच्या दुतर्फा बेशिस्तपणे वाहने उभी करत असल्याने येथे वाहतुकीची कोंडी झालेली दिसते, तर ग्राहकांची मासळी येथेच विक्रेते साफ करत असल्याने या ठिकाणी दुर्गंधी पसरलेली असते.

नजीकच्या मटणमार्केटमधून कोंबड्या, बोकड यांची पिसे, अवशेष, टाकाऊ पदार्थ या मार्गाच्या बाजूलाच टाकले जात असल्याने भटकी जनावरे, कुत्री या परिसरात ते अस्ताव्यस्त पसरवून ठेवतात. परिणामी, आरोग्यास धोकादायक रोगजंतू निर्माण होतील, अशी स्थिती जगबुडी नदीकिनारी शहराच्या दर्शनी भागातच दिसून येते.

किनाऱ्यावर उभ्या असलेल्या अनेक इमारतींमध्ये निर्माण होणारे हजारो लिटर सांडपाणी या रस्त्यालगत वाहत जाऊन जगबुडी नदीत मिसळत आहे. शहरातून पावसाचे पाणी जगबुडी नदीत थेट सोडण्यासाठी बांधण्यात आलेल्या भुयारी गटारांचे काम अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीत असून, शहरातील बहुतांश इमारतींचे सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करताच थेट सोडण्यात आले असून, त्याचा निचरादेखील या बंदरमार्गानजीक उघडे ठेवण्यात आलेल्या भुयारी गटारांच्या मुखातून होताना दिसत आहे.

भुयारी गटारांमध्ये साचलेल्या सांडपाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत असून, सायंकाळी बंदरमार्गावर व परिसरात त्याचा उपद्रव नागरिकांनाच सहन करावा लागत आहे. या मार्गावरून मार्गक्रमण करताना नाकावर हात घेऊनच प्रवास करावा लागतो आहे. पालिका प्रशासन या ठिकाणी स्वच्छता राखण्यात सपशेल अपयशी ठरत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!