जव्हार तालुक्यातील नागरी सुविधांचा प्रश्न ऐरणीवर असतानाच, तिलोंडा (आंबेपाडा) येथील एका गंभीर आजाराने ग्रस्त तरुणाचा रस्त्यांअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने बुधवारी पहाटे दुर्दैवी मृत्यू झाला. शैलेश मगन वागदडा (वय १८) असे मृत तरुणाचे नाव असून, या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री शैलेश याची प्रकृती अचानक खालावली. छातीत दुखणे व श्वास घेण्यास त्रास होत असल्याने कुटुंबीयांनी त्याला तातडीने जव्हार येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिलोंडा गावातून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या आंबेपाडापर्यंत जाण्यासाठीही पक्क्या रस्त्याची सोय नसल्याने ग्रामस्थांवर शैलेशला डोलीतून डोंगरवाटेने घेऊन जाण्याची वेळ आली.
अंधार, खडतर डोंगरवाटा आणि रस्त्याअभावी निर्माण झालेल्या अडचणींमुळे अर्ध्या रस्त्यातच शैलेशची प्रकृती अधिकच बिघडली. वेळेत वैद्यकीय उपचार न मिळाल्याने पहाटेच त्याची प्राणज्योत मालवली. उपचाराअभावी एका निष्पाप तरुणाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पावसाळ्यात जगणे बनते कठीण
तिलोंडा (आंबेपाडा) हे आदिवासीबहुल गाव आजही मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित आहे. पावसाळ्यात या गावाचा बाह्य जगाशी संपर्क पूर्णतः तुटतो. रुग्णवाहिका, चारचाकी वाहन किंवा अत्यावश्यक सेवा गावात पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे आजारी रुग्ण, गर्भवती महिला किंवा अपघातग्रस्तांना जीव धोक्यात घालून डोलीतून किंवा खांद्यावर उचलून नेणे हाच एकमेव पर्याय उरतो.
शैलेशच्या मृत्यूने पुन्हा एकदा “रस्ते नाहीत म्हणजे उपचार नाहीत” ही भयावह वास्तव परिस्थिती समोर आली आहे. गावासाठी अनेकवेळा रस्त्याची मागणी करूनही प्रशासनाने केवळ आश्वासनांपलीकडे काहीही केले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून, तातडीने पक्क्या रस्त्याची व आरोग्य सुविधांची सोय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. एका तरुणाचा मृत्यू हा केवळ अपघात नसून, प्रशासनाच्या दुर्लक्षाचा बळी असल्याची भावना गावकऱ्यांतून व्यक्त होत आहे.











