ठाणे तालुक्यात अनधिकृत गौण खनिज उत्खनन व त्याच्या बेकायदेशीर वाहतुकीच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत ठाणे तहसील प्रशासनाने मोठी आणि कडक कारवाई सुरू केली आहे. या प्रकरणी एकूण १०८ प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश ठाणे तहसीलदारांनी संबंधित तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
ही कारवाई ठाणे, बाळकुम, बेलापूर, मुंब्रा, दहिसर आदी गावांमधील अनधिकृत उत्खनन करणारे कंत्राटदार, जमीन मालक तसेच बेकायदेशीर कब्जेदारांविरोधात करण्यात येत आहे. शासनाच्या महसूल व पर्यावरण नियमांचे सर्रास उल्लंघन करत मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या.
ठाणे तहसील कार्यालयाकडून यापूर्वी संबंधितांना अनेक वेळा नोटिसा बजावून तसेच तोंडी व लेखी स्वरूपात सूचना देऊनही अधिकृत उत्खननासाठी शासनाने ठरवून दिलेली दंडनीय रक्कम अनेक जमीन मालकांनी अद्याप भरलेली नसल्याचे निष्पन्न झाले आहे. काही प्रकरणांमध्ये तर संबंधितांकडे सक्षम न्यायालयाचा कोणताही आदेशही नसताना उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले आहे.
वारंवार संधी देऊनही शासनाची दंडात्मक रक्कम न भरता नियमांचे उल्लंघन सुरूच ठेवल्यामुळे महसूल प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. यामध्ये संबंधित कसूरदारांची मालमत्ता जप्त करून लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, त्याचबरोबर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कार्यवाहीही हाती घेण्यात आली आहे.
या संदर्भात ठाणे तहसीलदार उमेश पाटील यांनी सांगितले की,
“अनधिकृत गौण खनिज उत्खनन प्रकरणांमध्ये फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात येत आहे. शासनाच्या महसूल व पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढे कोणतीही तडजोड केली जाणार नाही. अशा कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहतील.”
महसूल प्रशासनाच्या या कारवाईमुळे ठाणे तालुक्यातील अनधिकृत उत्खनन व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.











