गेवराई तालुक्यातील तलवाडा परिसरात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह गावातील विहिरीत आढळून आल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.या घटनेमुळे कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
तलवाडा येथील अंबिका नगर भागात राहणारा रामेश्वर मोहन शिंगणे (वय 25) हा तरुण 31 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळच्या सुमारास रागाच्या भरात घरातून बाहेर पडला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेऊनही रामेश्वरचा काहीही मागमूस न लागल्याने अखेर त्याच्या आईने तलवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्यानुसार बेपत्ता व्यक्तीची नोंद घेत तपास सुरू केला होता. दरम्यान, आज अंबिका नगर परिसरातील एका विहिरीत नागरिकांना एका मृतदेहाचा संशयास्पद अवस्थेत आढळ झाला.
घटनेची माहिती मिळताच तलवाडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज निलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कैलास अन्नादास, बीट अंमलदार अंजन गडदे आणि पोलीस हवालदार नारायण काकडे हे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पाहणीअंती विहिरीत आढळलेला मृतदेह हा बेपत्ता असलेल्या रामेश्वर (उर्फ गोरख) शिंगणे याचाच असल्याची ओळख पटवण्यात आली.
विहिरीतील पाण्यामुळे मृतदेह पूर्णतः खराब अवस्थेत आढळून आला होता. त्यामुळे घटनास्थळीच शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पाडण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास तलवाडा पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू असून मृत्यूमागील नेमके कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे अंबिका नगरसह संपूर्ण तलवाडा परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.











