प्रजासत्ताक दिनासारख्या संविधानाच्या गौरवाच्या दिवशीच जर संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेतले जात नसेल, तर हा केवळ विसर नाही, तर जाणीवपूर्वक केलेली चूक आहे, असा आरोप करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नाशिकमध्ये ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभात गिरीश महाजन यांनी केलेल्या भाषणात एकदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख न झाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. संविधान लागू झाल्याचा दिवस साजरा करताना संविधानाच्या जनकाचे नाव टाळले जाणे ही बाब अनेकांना खटकणारी ठरली आहे.
नेमकी घटना काय?
नाशिक येथे पार पडलेल्या शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थितांना संबोधित केले. मात्र, संपूर्ण भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने कार्यक्रमस्थळीच कुजबुज सुरू झाली. हे नाव जाणीवपूर्वक टाळले की चुकून राहिले, यावरून वाद निर्माण झाला असून या घटनेचे तीव्र राजकीय पडसाद उमटू लागले आहेत.
महिला वनरक्षकाचा थेट सवाल
या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या माधवी जाधव या महिला वनरक्षकाने भर सभेत संताप व्यक्त करत थेट सवाल उपस्थित केला.
“संविधानामुळेच आज आपण अधिकारी, मंत्री आहोत. मग संविधानाच्या जनकाचे नाव घ्यायला विसर कसा पडतो?” असा सवाल त्यांनी केला.
“मला निलंबित केलं तरी चालेल, पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाणार नाही,” असे ठाम शब्द त्यांनी वापरले.
प्रकाश आंबेडकरांचा कडक इशारा
या घटनेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी माधवी जाधव यांच्याशी फोनवरून संवाद साधत त्यांचे समर्थन केले.“मंत्री गिरीश महाजन यांची ही कृती म्हणजे नीच मानसिकतेचे दर्शन आहे. हा प्रकार अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा ठरू शकतो,” असे म्हणत त्यांनी थेट कारवाईची मागणी केली.
आंबेडकर पुढे म्हणाले,“वंचित बहुजन आघाडीची स्थानिक समिती पोलिसांत तक्रार दाखल करत आहे. पोलिसांनी जर गुन्हा नोंदवला नाही, तर मी स्वतः कायदेशीर मसुदा तयार करून त्यांना कारवाई करण्यास भाग पाडेन.”
राजकीय वातावरण तापले
या प्रकरणामुळे नाशिकचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, संविधान दिनाच्या कार्यक्रमात बाबासाहेबांचे नाव न घेणे ही गंभीर चूक असल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे. लोकशाहीच्या उत्सवात लोकशाहीच्या शिल्पकारालाच विसरणे योग्य नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.











