पुणे | आंबेगाव पठार : पुणे प्रतिनधी – ज्योतिबा सावंत
आंबेगाव पठार, भारती विद्यापीठ व धनकवडी परिसराला मुंबई–पुणे महामार्गाशी जोडणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाची पाहणी नव्याने निवडून आलेल्या नगरसेविका सौ. प्रतिभा ताई चोरघे यांनी केली.
या पाहणीवेळी त्यांचे पती रोहिदास बाप्पू चोरघे हे देखील उपस्थित होते. तसेच पुणे महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्याशी प्रत्यक्ष स्थळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या रस्त्यावर यापूर्वी तीव्र उतारामुळे अनेक अपघात घडले असून, त्यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत तर काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन सौ. प्रतिभा ताई चोरघे यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची ठाम भूमिका मांडली.
“हा रस्ता परिसरातील हजारो नागरिकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. कामात कोणतीही दिरंगाई न करता ते योग्य दर्जाने, नियोजनबद्ध पद्धतीने आणि शक्य तितक्या लवकर पूर्ण करून नागरिकांच्या वापरासाठी खुला करण्यात यावा,” अशी स्पष्ट व ठाम मागणी त्यांनी मनपा अधिकाऱ्यांकडे केली.
रोहिदास बाप्पू चोरघे यांनीही रस्त्याच्या कामामुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासाचा मुद्दा उपस्थित करत, कामात गती आणून नागरिकांचा धोका कमी करण्याची गरज अधोरेखित केली.
तसेच भविष्यात वाहतूक कोंडी, अपघात व अडथळे टाळण्यासाठी योग्य नियोजन करण्यात यावे, अशी सूचना यावेळी करण्यात आली.
नगरसेविका सौ. प्रतिभा ताई चोरघे यांनी या रस्त्याच्या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ दिली जाणार नाही, अशी ग्वाही दिली.











