पुणे:- राज्यातील महानगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. राज्यातील सर्वच बडे नेते प्रचारात व्यस्त आहेत. अशातच आज पुण्यात अभिनेत्री गिरिजा ओक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत गिरिजा ओक यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. यात एक प्रश्न असा होता की राज्यात सत्तेत असणारे अजित पवार महापालिकांच्या प्रचारात भाजपवर टीका का करतात? यामागील नेमकं कारण फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते नेमकं काय काय म्हणाले ते सविस्तर जाणून घेऊयात.
अजित पवार टीका का करतात?
या मुलाखतीच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांना काय म्हणताय देवा भाऊ असं विचारण्यात आलं. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘देवाभाऊ काही म्हणत नाही. देवाभाऊचं काम बोलतं.’ त्यानंतर गिरिजा ओक यांनी त्यांना तुमचं काम बोलतं मग अजितदादा टीका करतात? याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, अजितदादा बोलतात. माझं काम बोलतं. पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढू शकत नाही हे आमच्या लक्षात आलं होतं. कारण दोन्ही स्ट्रॉंग पार्टी आहोत. आपण जिथे एकमेकांविरोधात लढत आहोत. तर मैत्रीपूर्ण लढत आहोत. एकमेकांवर टीका करू नये. मी हा संयम पाळला. दादांचा संयम ढळला आहे. पण 15 तारखेनंतर नाही बोलणार.’
ठाकरे बंधुंच्या युतीवर भाष्य
मुलाखतीत पुढे देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधुंच्या युतीवर प्रश्न विचारण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले ती, ‘कोणताही परिवार एकत्र येत असेल तर आनंद आहे. त्याबाबत मी राज ठाकरेंचे आभार मानतो त्यांनी मला क्रेडिट दिलं. बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं. त्यांनी प्रयत्न केला. दोन भाऊ एकत्र आले नाही. पण मी आणले. त्यामुळे मला बाळासाहेब आशीर्वादच देतील. पण दोन भाऊ बहीण एकत्र येणार का हे माहीत नाही. 15 तारखेनंतर करेल.’











