पुणे: पुणे शहर पोलिस दलातील कर्तव्यावर असताना निष्काळजीपणा केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, तपासाच्या कामासाठी सातारा जिल्ह्यात गेलेल्या पोलिस पथकाने अधिकृत कामाऐवजी पर्यटनाला प्राधान्य दिल्याचे विभागीय चौकशीत निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी महिला पोलीस उपनिरीक्षक, एक पोलीस हवालदार आणि एक पोलीस शिपाई अशा तिघांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात आली असून, अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी त्यांच्या दोन वर्षांच्या वार्षिक वेतनवाढीवर स्थगिती आणण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून, कर्तव्याच्या काळातील शिस्त आणि जबाबदारीबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल रोजी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी संबंधित महिला पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार आणि पोलीस शिपाई हे फिर्यादी महिलेला सोबत घेऊन सातारा येथे गेले होते. तपास पूर्ण करून तातडीने पुण्यात परतणे अपेक्षित असताना संबंधित अधिकाऱ्यांनी अधिकृत कामाऐवजी पर्यटनाला प्राधान्य दिल्याचा आरोप विभागीय चौकशीत सिद्ध झाला.
चौकशी अहवालानुसार, सातारा जिल्ह्यात पोहोचल्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तपासाबाबत माहिती देणे ही आवश्यक प्रक्रिया होती. मात्र, संबंधित पथकाने ही प्रक्रिया वेळेवर पूर्ण केली नाही. त्याऐवजी त्यांनी प्रथम एका प्रसिद्ध ढाब्यावर जाऊन भोजन केले. त्यानंतर दुपारी साडेतीनच्या सुमारास शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजेरी लावण्यात आली आणि संबंधित घटनास्थळी जाऊन केवळ औपचारिक पंचनामा करण्यात आला.
मात्र, तपासाचा महत्त्वाचा भाग असलेल्या घटनास्थळावरील व्यक्ती, साक्षीदार किंवा परिसरातील नागरिकांची सखोल चौकशी करण्यात आली नसल्याचे विभागीय चौकशीत स्पष्ट झाले. त्यामुळे तपासाची प्रक्रिया केवळ औपचारिक स्वरूपात पार पडल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतर संबंधित पथकाने त्वरित पुण्याकडे परतण्याऐवजी थेट साताऱ्यातील प्रसिद्ध कास पठार गाठले. तेथे त्यांनी काही वेळ पर्यटनाचा आनंद घेतला तसेच परिसरातील इतर पर्यटनस्थळांनाही भेटी दिल्याचे चौकशीत समोर आले. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत असलेल्या फिर्यादी महिलेने तिच्या आईची प्रकृती गंभीर असल्याने शक्य तितक्या लवकर पुण्यात परतण्याची विनंती केली होती. मात्र, तिच्या विनंतीकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा ठपका विभागीय चौकशीत ठेवण्यात आला आहे.
पर्यटन आटोपल्यानंतर संबंधित पथक रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पुण्यात परतले. मात्र, त्यानंतरही फिर्यादी महिलेला सुरक्षितपणे तिच्या घरी पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडण्यात आली नाही. सुरुवातीला तिला स्वारगेट बसस्थानकावर सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. महिलेने त्यास विरोध केल्यानंतर तिला शनिवार पेठ पोलीस चौकीजवळ सोडण्यात आल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे. या प्रकारामुळे पोलिसांच्या संवेदनशीलतेवर आणि जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान संबंधित तिघांनी कर्तव्यात निष्काळजीपणा, बेशिस्तपणा आणि हलगर्जीपणा केल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले. तसेच त्यांच्या वर्तनामुळे पुणे पोलिस दलाची प्रतिमा जनतेसमोर मलिन झाल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या निष्कर्षांच्या आधारे अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी महिला पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार आणि पोलीस शिपाई या तिघांवर दोन वर्षांसाठी वार्षिक वेतनवाढ रोखण्याची शिस्तभंगाची शिक्षा सुनावली आहे. ही कारवाई पोलिस दलातील शिस्त अबाधित ठेवण्यासाठी आणि कर्तव्याच्या काळात कोणत्याही प्रकारचा गैरवापर किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश देणारी मानली जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे सरकारी कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडणे किती महत्त्वाचे आहे, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास कायम राखण्यासाठी अशा प्रकारच्या घटनांवर कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.











