पुणे, प्रतिनिधी : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात रविवारी उशिरा रात्री अत्यंत धाडसी दरोड्याची घटना घडली. मद्य विक्री दुकानातील दिवसभराची आठ लाख रुपयांची रोकड घेऊन निघालेल्या कॅशिअरला चार अज्ञात दरोडेखोरांनी अडवून त्याच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारला. त्यानंतर त्याला मारहाण करत रोकड असलेली बॅग हिसकावून आरोपी दुचाकीवरून पसार झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या प्रकरणी हौसकुमार प्रकाश इंगळे (वय ४२) यांनी नऱ्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. इंगळे हे नऱ्हे येथील एका मद्य विक्री दुकानात कॅशिअर म्हणून कार्यरत आहेत. रविवारी (दि. २६) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ते दुकानातील दिवसभराची रोकड दुचाकीवरून पिंपरीतील डांगे चौकाच्या दिशेने घेऊन जात होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता परिसरातील प्रयेजा सिटी मार्गाजवळील वारजेकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात दरोडेखोरांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना अडवले. आरोपींनी त्यांच्या चेहऱ्यावर स्प्रे फवारत त्यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे इंगळे गोंधळून गेले. त्यानंतर आरोपींनी त्यांना मारहाण करून रोकड असलेली बॅग हिसकावून काही क्षणांत घटनास्थळावरून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त अबिनाश कुमार, सहाय्यक पोलिस आयुक्त विजय कुंभार तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक वर्षा देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले असून आरोपींची ओळख पटविण्यासाठी आणि त्यांचा माग काढण्यासाठी विशेष पथके कामाला लागली आहेत.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) ईश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, शहरात घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मोठ्या प्रमाणात रोकड वाहून नेताना योग्य सुरक्षा व्यवस्था आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.











