मुंबई / जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला आता अधिक तीव्र स्वरूप देण्याचा निर्णय मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केला आहे. राज्य सरकारवर मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप करत त्यांनी २९ ऑगस्ट रोजी निर्णायक आंदोलन छेडण्याची घोषणा केली. “आता मी जाईन नाहीतर सरकार जाईल,” असा इशारा देत त्यांनी सरकारला अंतिम निर्णय घेण्याचे आवाहन केले.
जरांगे पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत सरकारकडून वारंवार आश्वासने दिली जात असली, तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस अंमलबजावणी होत नाही. आंदोलनाला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असूनही समाजाच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
ते म्हणाले की, मराठा समाजाला सातत्याने आश्वासनांच्या भूलथापा दिल्या जात आहेत. त्यामुळे आता आणखी किती काळ संयम बाळगायचा, याचा गंभीर विचार करण्याची वेळ आली आहे. आरक्षणाअभावी मराठा समाजातील अनेक युवकांना शिक्षण आणि नोकरीच्या संधी गमवाव्या लागत असून त्यांचे भविष्य धोक्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी राज्यातील ५८ लाख मराठा नोंदींचा मुद्दाही पुन्हा उपस्थित केला. या नोंदींच्या आधारे आरक्षणासाठी पात्र ठरणाऱ्या नागरिकांना तातडीने जातप्रमाणपत्रे देण्यात यावीत, अशी मागणी त्यांनी केली. मात्र सरकार याबाबत कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
तसेच, ज्या नागरिकांच्या मराठा समाजाच्या नोंदी उपलब्ध आहेत, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह तातडीने अर्ज दाखल करावेत, असे आवाहन करत प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
२९ ऑगस्ट रोजीचे आंदोलन हे मराठा समाजाच्या इतिहासातील सर्वात मोठे आणि निर्णायक आंदोलन ठरेल, असा दावा करत त्यांनी राज्यभरातील मराठा बांधवांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. आजपासूनच आंदोलनाच्या तयारीला लागावे आणि शांततेच्या मार्गाने एकजूट दाखवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या या घोषणेमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंदोलनापूर्वी मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकार कोणती भूमिका घेते, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.











