पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वाढती वाहतूक कोंडी, वायू प्रदूषण आणि सार्वजनिक वाहतुकीवरील वाढता ताण लक्षात घेऊन शहरासाठी अत्याधुनिक ई-आरटीएस (इलेक्ट्रिक रॅपिड ट्रान्सिट सिस्टीम) प्रकल्प राबविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आवश्यक सर्व प्रशासकीय प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रायोगिक प्रकल्प नियोजित कालावधीत सुरू करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी बैठकीनंतर माहिती देताना सांगितले की, शहरातील नागरिकांना आधुनिक, पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि जलद सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. महामेट्रोच्या सहकार्याने हा प्रकल्प सुमारे दीड वर्षांच्या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मुंबई येथे झालेल्या बैठकीत भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचा विचार करून एचसीएमटीआर (हाय कॅपेसिटी मास ट्रान्सिट रूट) आणि वर्तुळाकार मार्ग विकास प्रकल्पावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. शहरातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, गतिमान आणि प्रवासाभिमुख करण्यासाठी ई-आरटीएस महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
अशी असेल ई-आरटीएस व्यवस्था
ई-आरटीएस प्रणाली मेट्रोप्रमाणेच वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी असेल. या प्रणालीतील वाहने पूर्णपणे इलेक्ट्रिक असून ती रबर टायरवर धावतील. प्रत्येक वाहनातून २४० हून अधिक प्रवासी प्रवास करू शकतील. त्यामुळे कमी वेळेत अधिक प्रवाशांची वाहतूक करणे शक्य होणार आहे.
पहिल्या टप्प्यात १७ किलोमीटरचा मार्ग
प्रायोगिक स्वरूपात सुमारे १७ किलोमीटर लांबीचा मार्ग विकसित करण्यात येणार आहे. प्रस्तावित मार्ग पुढीलप्रमाणे आहे:
राजा शिवछत्रपती चौक (गोडाऊन चौक) – कुदळवाडी चौक – केएसबी चौक – ऑटो क्लस्टर – एम्पायर इस्टेट – काळेवाडी फाटा – जगताप डेअरी चौक – वाकड
महामार्ग, मेट्रो आणि रेल्वेशी प्रभावी जोडणी
या प्रकल्पामुळे पुणे–नाशिक, मुंबई–पुणे आणि मुंबई–बंगळूर महामार्ग, तसेच शहरातील मेट्रो मार्ग, रेल्वे स्थानके आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांशी प्रभावी जोडणी निर्माण होणार आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक जलद, सुलभ आणि अखंड प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
पुढील टप्प्यात संपूर्ण शहरात विस्तार
प्रायोगिक प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर शहरातील एचसीएमटीआर मार्ग आणि सर्व बीआरटी मार्गांवर टप्प्याटप्प्याने ई-आरटीएसचा विस्तार करण्यात येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नवे बळ मिळण्यासह भविष्यातील वाहतूक नियोजन अधिक सक्षम होणार आहे.
नागरिकांना होणारे प्रमुख फायदे
- शहरातील वाहतूक कोंडीत मोठी घट
- वायू प्रदूषण कमी होण्यास मदत
- सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढणार
- सुरक्षित, वेगवान आणि आरामदायी प्रवास
- पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला चालना
- मेट्रो, बीआरटी आणि रेल्वेशी सुलभ जोडणी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संकल्पनेचे स्वागत करत प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेला नवी दिशा देणारा हा प्रकल्प ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











