पुणे | प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील सुपे परिसरात रविवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घरापासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असताना काळाने घाला घातल्याने ठोंबरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे सुपे गावासह परिसरात शोककळा पसरली आहे.
ही दुर्घटना रविवारी (दि. २६) दुपारी सुपे-चौफुला मार्गावरील सोंड परिसरातील अहिल्याबाई होळकर चौकाजवळ घडली. या अपघातात सोमनाथ दत्तात्रेय ठोंबरे (वय १९) याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा धाकटा भाऊ शुभम दत्तात्रेय ठोंबरे (वय १८, दोघेही रा. सुपे, शेंडगेवस्ती) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही भाऊ दुचाकीवरून सुपेच्या दिशेने जात होते. अहिल्याबाई होळकर चौकाजवळील वळणावर दुचाकीचा तोल गेल्याने ती घसरली. त्याचवेळी समोरून येणाऱ्या ट्रकखाली दोघेही सापडले. अपघात इतका भीषण होता की सोमनाथचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी झालेल्या शुभमला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांच्या उपचारांदरम्यान त्याचीही प्राणज्योत मालवली.
अपघाताची माहिती मिळताच सुपे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, ट्रकचालक अभिषेक बाबू चव्हाण (वय २२, रा. वारणानगर, जि. कोल्हापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुपे पोलीस करत आहेत.
मृत दोन्ही भाऊ मेंढपाळ कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. मेहनती आणि शांत स्वभावामुळे दोघेही परिसरात परिचित होते. एकाच कुटुंबातील दोन तरुण मुलांचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनाही मोठा धक्का बसला आहे. घटनेनंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांनी रुग्णालय व घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
या अपघातामुळे सुपे-चौफुला मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
दरम्यान, स्थानिक नागरिकांनी या चौकात वारंवार अपघात होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. धोकादायक वळण, भरधाव वाहने आणि वेग नियंत्रणासाठी पुरेशा उपाययोजनांचा अभाव यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या ठिकाणी वेगमर्यादा फलक, रंबल स्ट्रिप, इशारा फलक आणि वाहतूक नियंत्रणाच्या उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
एकाच वेळी दोन मुलांना गमावल्याने ठोंबरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण सुपे परिसर शोकमग्न झाला आहे.










