July 27, 2026 6:26 pm

पासपोर्टसाठी प्रचंड गर्दी; पुणेकरांना अपॉइंटमेंटसाठी दोन महिन्यांची प्रतीक्षा, पासपोर्ट ऑक्टोबरमध्ये मिळण्याची शक्यता

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे, दि. 27– परदेशात शिक्षण, नोकरी, व्यवसाय, पर्यटन आणि स्थलांतरासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढल्याने देशभरात पासपोर्ट अर्जांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यातच केंद्र सरकारने जुन्या शुल्कात अर्ज करण्यासाठी दिलेल्या चार दिवसांच्या विशेष मुदतीमुळे लाखो नागरिकांनी अर्ज केल्याने पुण्यासह अनेक पासपोर्ट सेवा केंद्रांवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

सध्या पुणे पासपोर्ट सेवा केंद्रात नवीन अर्जदारांना सप्टेंबरअखेरीस अपॉइंटमेंट मिळत आहे. त्यानंतर कागदपत्रांची पडताळणी, पोलिस व्हेरिफिकेशन आणि छपाई प्रक्रिया पूर्ण होऊन पासपोर्ट ऑक्टोबरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवड केंद्रातही ऑक्टोबरच्या मध्यापर्यंतच्या तारखाच उपलब्ध आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने २५ जून रोजी सुमारे १४ वर्षांनंतर पासपोर्ट शुल्कात वाढ जाहीर केली. मात्र, जुन्या शुल्कात अर्ज करण्यासाठी दिलेल्या चार दिवसांच्या मुदतीत देशभरातून सुमारे १५ लाख अपॉइंटमेंट बुक झाल्याने सर्वच केंद्रांवर अतिरिक्त ताण आला.

परदेशातील शिक्षण, रोजगार, पर्यटन आणि व्यवसायाच्या वाढत्या संधींमुळे पासपोर्टची मागणी सातत्याने वाढत आहे. पूर्वी महानगरांपुरती मर्यादित असलेली ही मागणी आता ग्रामीण आणि निमशहरी भागातही वाढली असून, सुट्ट्यांच्या काळात अर्जांची संख्या अधिक असते.

पाषाण येथील प्रादेशिक पासपोर्ट सेवा केंद्रात दररोज सुमारे १,७०० नियमित आणि तत्काळ व वॉक-इनसह जवळपास २,००० अर्जांची प्रक्रिया केली जाते. तरीही सुमारे १० टक्के अर्जदार अपॉइंटमेंटला अनुपस्थित राहत असल्याने रिकामे स्लॉट वाया जातात आणि इतर अर्जदारांचा विलंब वाढतो.

पासपोर्ट अर्ज प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज, कागदपत्र पडताळणी, बायोमेट्रिक नोंदणी, पोलिस पडताळणी आणि अंतिम मंजुरी असे टप्पे असतात. वाढलेल्या अर्जांमुळे संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी सध्या अधिक वेळ लागत आहे.

तातडीच्या प्रवासासाठी ‘तत्काळ’ योजनेची सुविधा उपलब्ध असली तरी या श्रेणीतील स्लॉट मर्यादित असल्याने ते लवकर भरतात. त्यामुळे नागरिकांनी प्रवासाचे नियोजन आधीच करून वेळेत अर्ज करावा, असे आवाहन पासपोर्ट अधिकाऱ्यांनी केले आहे.

सध्या उपलब्ध असलेल्या काही अपॉइंटमेंट तारखा :

– पुणे – २३ सप्टेंबर
– पुणे तत्काळ – ३० जुलै
– पिंपरी-चिंचवड – १५ ऑक्टोबर
– बारामती – १७ ऑगस्ट
– शिरूर – २० ऑगस्ट
– कोल्हापूर – २८ ऑगस्ट
– सातारा – ३१ ऑगस्ट
– सोलापूर – १ सप्टेंबर

पासपोर्टची वाढती मागणी आणि मर्यादित स्लॉट लक्षात घेता नागरिकांनी किमान दोन ते तीन महिने आधी अर्ज करणे आणि मिळालेल्या अपॉइंटमेंटला वेळेत उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!