पुणेनजीक कात्रजच्या बोगद्यात अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने उमद्या तरूणाचा दुर्दैवी अंत झाला. वैभव दशरथ पाटील (वय २३, मूळगाव सरोळी, ता. गडहिंग्लज, सध्या रा.सोहराब चाळ, डिलाईल रोड, लोअर परेल मुंबई) असे त्याचे नाव आहे. त्याच्या अकाली जाण्याने वैभू लई घाई केलसं भावा या शब्दांत मित्रमंडळी शोक व्यक्त करीत आहेत.
अधिक माहिती अशी, सरोळी येथील अल्पभूधारक शेतकरी दशरथ पाटील यांचा वैभव हा एकुलता मुलगा. दहावीनंतर त्याने संत गजानन महाराज रूरल पॉलिटेक्निकमधून सिव्हील इंजिनिअिरंगची पदविका घेतली. त्यानंतर दोन वषार्पूर्वीच रोजगारासाठी मुंबई गाठली. खाजगी बांधकाम कंपनीत नोकरी मिळाली. पण, तिथे कुणी नातेवाईक नसल्यामुळे ग्रामस्थ मंडळाच्या बैठकीच्या खोलीत तो राहत होता.
दरम्यान, २९ वषार्नंतर झालेल्या श्री महालक्ष्मी यात्रेच्या निमित्ताने दुचाकीवरून ३० एप्रिलला तो गावी आला होता. सुट्टी संपल्यानंतर पुन्हा कामावर हजर होण्यासाठी सोमवारी (१८) पहाटे चारच्या सुमारास दुचाकीवरून तो मुंबईला निघाला होता. दरम्यान, सकाळी आठच्या सुमारास कात्रजच्या बोगद्यात अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. दुचाकीवरून खाली कोसळल्यानंतर ते वाहन अंगावरून पुढे गेल्याने त्याच्या छातीला गंभीर दुखापत झाली होती.
वाहतूक पोलिसांनी तातडीने त्याला उपचारासाठी खाजगी रूग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. त्याच्या पश्चात आई, वडील, विवाहित बहिण असा परिवार आहे.
६ फूट उंची, रंगाने गोरा असणारा वैभव एखाद्या हिरोसारखा देखणा व रूबाबदार होता. मनमिळावू स्वभावामुळे त्याचा मित्रपरिवारही मोठा होता. नोकरी करतच तो शरीरसौष्ठव स्पधेर्ची तयारीही करीत होता. मुंबई श्रीचा किताब मिळवण्याचे ध्येय त्याने उशीरा बाळगले होते. मात्र, काळाने त्याच्यावर अकालीच झडप घातली. दुचाकीच्या नंबरप्लेटवरूनच त्याची ओळख पटली.
वैभवला महागड्या दुचाकीचा छंद होता. पगारातील पैसे साठवून पहिल्यांदा त्याने दीड लाखाची दुचाकी घेतली होती. त्यानंतर त्याने अलिकडेच अडीच लाखाची दुचाकी खरेदी केली होती. वेळ वाचतो म्हणून दुचाकीवरूनच तो कामाच्या ठिकाणी ये-जा करीत होता. दुचाकीमुळे धकाधकीच्या मुंबापुरती कामावर जाण्या-येण्याची वेळ वाचवली. मात्र, काळ बनून आलेल्या अज्ञात वाहनाने त्याचा घात केला.











