June 5, 2026 9:16 am

सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीचे सत्र; एकाचा खून

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

सांगलीत मंगळवारी पहाटेच्या सुमारास एका व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला तर तासगावमध्ये संशयित आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीसांवर हल्ला करण्याचा प्रकार घडला.

तसेच चोरोची (ता. कवठेमहांकाळ) येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला असून त्याचा मृत्यू संशयास्पद असल्याने पोलीसांना वैद्यकीय तपासणीच्या अहवालाची प्रतिक्षा आहे.

सांगलीतील वसंतदादा कारखान्याच्या मागील बाजूस असलेल्या गाडी तळावर राजेश बाबुराव घायतिडके (वय ५५) या व्यक्तीचा खून करण्यात आल्याची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. अज्ञातांने डोक्यात दगड घातल्याने अतिरक्तस्त्राव होउन घायतिडके याचा जागीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासावरून स्पष्ट झाले.ही घटना समजताच संजयनगर पोलीस ठाण्याचे पोलीस, उप अधिक्षक संदीप भागवत यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. हा खून कोणी केला, कोणत्या कारणावरून केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, संशयितांना पकडण्यासाठी तीन पथके तैनात करण्यात आल्याचे उप अधिक्षक श्री. भागवत यांनी सांगितले.

दरम्यान, तासगाव येथील पलूस रस्त्यावर असलेल्या पारधी वस्तीवर संशयिताला पकडण्यासाठी तासगाव पोलीसांचे पथक गेले असता वस्तीवरील लोकांनी हल्ला करण्याचा प्रकार मंगळवारी पहाटे घडला.एका गुन्ह्यातील संशयित वस्तीवर असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. या संशयिताला ताब्यात घेण्यासाठी तासगाव पोलीस ठाण्यातील गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक आज पहाटे पारधी वस्तीवर गेले होते.

पोलीसांचे वाहन वस्तीवर आल्याचे पाहून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत काही पोलीसांना इजा झाली असून पोलीसांनी संशयिताला ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्यांने एका पोलीस कर्मचार्‍याच्या हाताला चावा घेतला. त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी सांगितले. जखमी पोलीसांच्यावर उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले.

दत्तात्रय चाबरे (रा. चोरोची ता. कवठेमहांकाळ) या व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाला असून त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आला. पार्थिव उप जिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले असून वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!