प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ डाॅ. आनंद नाडकर्णी यांचे शुक्रवारी पहाटे ५ वाजता दु:खद निधन झाले. डाॅ. आनंद नाडकर्णी यांच्या निधनानंतर सर्वच क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या समाजमाध्यमावर प्रतक्रिया दिली.
एकनाथ शिंदे यांनी ‘एक्स’ पोस्टमध्ये म्हटले की, ज्येष्ठ मनोविकारतज्ज्ञ डॉ.आनंद नाडकर्णी यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्का देणारे आहे. असीम उर्जा आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाचे धनी असलेले डॉ. नाडकर्णी हे ठाण्याचे लाडके सुपूत्र. गेली साडेतीन दशके मनोविकारशास्त्राच्या क्षेत्रात त्यांनी निरलसपणे काम केले. ‘सुदृढ मन सर्वांसाठी’ हे ब्रीद घेऊन त्यांनी ‘इन्सिट्यूट फॉर सायकॉलॉजी’ या संस्थेची स्थापना केली. हजारो अस्थिर मनांना सावरून त्यांच्या कुटुंबियांचे ते खऱ्या मित्र बनले. त्याचवेळी, कै.डॉ.सुनंदा अवचट यांच्या साथीने त्यांनी पुण्यात ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली. या दोन्ही संस्थांनी समाजाची केलेली सेवा ही कोणत्याही स्वयंसेवी संस्थेने कशाप्रकारे काम करावे याचेच एक आदर्श प्रमाण असल्याचे शिंदे यांनी म्हटले.
तसेच, मनोविकारशास्त्राच्या क्षेत्रात व्यग्र असताना त्यांच्यात महाविद्यालयीन काळापासून कार्यरत असलेला लेखक, नाटककारही तेवढाच सक्रिय राहिला. ‘गद्दे पंचविशी’, ‘वैद्यक सत्ता’ यासह ‘शहाण्यांचा सायकिएट्रीस्ट’, ‘मनमैत्रीच्या प्रदेशात’ अशी सुमारे २७ प्रकाशित पुस्तके वाचकप्रिय आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारी आहेत.
नाट्य क्षेत्रात ‘जन्मरहस्य’, ‘त्या तिघांची गोष्ट’, ‘रंग माझा वेगळा’ ही नाटकेही रसिकप्रिय झाली. डॉ. नाडकर्णी यांच्या निधनामुळे उत्तम मनोविकारतज्ज्ञ, ललित लेखक, कवी, नाटककार, अभिनेता, संगीतकार, तबलावादक, चित्रकार, सामाजिक कार्यकर्ते, तत्वज्ञानाचे कृतीशील अभ्यासक असे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असेही पोस्टमध्ये म्हटले आहे.











