चाकण औद्योगिक वसाहतीतील मल्टिनॅशनल मर्सिडीज बेंज कंपनीमध्ये दोन दिवसापासून बिबट्या शिरला होता. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आले होते. हा बिबट्या भक्षाच्या शोधात कंपनीच्या आवारात आल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आल्यानंतर कर्मचारी, कामगार यामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.हा बिबट्या कंपनीत काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास पिंजऱ्यात जेरबंद झाला.अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक यांनी दिली.
मर्सिडीज बेंज कंपनीतील प्रोडक्शन हाऊस गेल्या दोन दिवसापासून खबरदारीचा उपाय म्हणून पूर्णपणे बंद ठेवण्यात आले होते. कंपनीचा विस्तार मोठा असल्याने बिबट्या नेमका कुठे लपला हे शोधण्यासाठी वनविभागाला मोठी कसरत करावी लागली. हे रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करण्यासाठी वनविभाग, रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट ,वाईल्ड लाईफएस ओएस यांनी समन्वय करून बिबट्याला अखेर जेरबंद केले. भुकेने व्याकुळ झालेला बिबट्या भक्षाच्या शोधात असताना पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला. हा बिबट्या पूर्ण वाढ झालेला नर आहे. त्याचे वय अंदाजे तीन ते चार वर्षे आहे.
वनसंरक्षक आशिष ठाकरे ,उपवनसंरक्षक प्रशांत खाडे ,सहाय्यक वनसंरक्षक अमृत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक वनपाल इंदलकर, श्रीमती जगताप, श्रीमती पिसाळ, चाकण विभागाचे सर्व कर्मचारी, माणिकडोह रेस्क्यू सेंटरचे डॉ. महेंद्र ढोरे, डॉ. अविनाश विसलकर, बावधन रेस्क्यू सेंटरचे डॉ. नचिकेत उत्पात, नेहा पंचमीया व त्यांचे पथक तसेच महाळुंगे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, मर्सिडीज बेंजचे सारंग जोशी, व्यंकटेश कुलकर्णी यांचे विशेष सहकार्य मिळाले. दोन दिवसाच्या तणावानंतर बिबट्या जेरबंद झाल्याने कंपनीचे कर्मचारी, स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.











