छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. येथील वसूसायगावमध्ये एका २१ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे.
गुरुवारी सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात असून एका कॉलेज तरुणीने अशा प्रकारे आयुष्य संपवल्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
निकिता नवनाथ नरोडे (२१) असे मृत विद्यार्थिनीचं नाव आहे. निकिता मूळची वसूसायगावची असली तरी, वयाच्या १२ व्या वर्षापासून ती शिक्षणासाठी गल्लेबोरगाव येथे आपल्या मावशीकडे वास्तव्यास होती. सध्या ती कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील एका नामांकित महाविद्यालयात बी.एस्सी. द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती.
गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास निकिताची मावशी आणि काका नेहमीप्रमाणे शेतातील कामासाठी घराबाहेर गेले होते. यावेळी घरात निकिता एकटीच होती. याच वेळेत तिने राहत्या घरातील छताला असलेल्या लोखंडी अँगलला ओढणी बांधून गळफास घेतला.
काही वेळाने हा प्रकार शेजारील नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने घराकडे धाव घेत निकिताच्या मावशीला या घटनेची माहिती दिली. ग्रामस्थांच्या मदतीने निकिताला खाली उतरवून तातडीने वेरूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. निकिताचा मृत्यू झाल्याचे समजताच तिच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.
घटनेची माहिती मिळताच खुलताबाद पोलीस ठाण्याच्या पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. निकिताने एवढे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणातून किंवा कोणत्या तणावातून उचलले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. पोलीस सध्या नातेवाईकांचे जबाब नोंदवत असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.











