नाशिकच्या बहुराष्ट्रीय TCS या आयटी कंपनीतील महिला लैगिंक शोषण व धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला छत्रपती संभाजीनगर येथून गुरुवारी (दि. 7) सायंकाळी अटक करण्यात आली.
नाशिक पोलिसांच्या पथकाने संभाजीनगर येथील गुन्हे शाखेच्या मदतीने ही संयुक्त कारवाई केली. छत्रपती संभाजी नगरातील नारेगाव येथील एका वसाहतीत ती कुटुंबासह लपली होती.
गेल्या दीड महिन्यांपासून फरार असलेली निदा खान संभाजीनगरमध्ये सापडल्याने या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळालं आहे. शिवसेना (शिंदे गटाचे) नेते व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. निदा खानला एमआयएमने सहकार्य केलं. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष जलली यांची चौकशी झाली पाहिजे. त्या चौकशीतून एक मोठे षड्यंत्र महाराष्ट्राला पाहायला मिळेल असा आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी केला आहे.
धर्मांतर करणे, मुलींना फसवणे हे सगळे प्रकार एमआयएमच्या महाशयांच्या नेतृत्वात होतात. निदा खान हा केवळ एक मोहरा आहे. त्यांचे जाळे महाराष्ट्रभर पसरले आहे. हे प्रकार पुणे, संभाजीनगरसह सगळीकडे पाहायला मिळतील. हे विष पसरवले जात असून हिंदूंचा द्वेष करणे व धर्मांतर करण्याचे प्रकार सुरू आहेत, असा आरोप शिरसाट यांनी केला.
मी मुख्यमंत्र्यांना भेटून या प्रकरणी SIT मार्फत चौकशी केली जावी अशी मागणी करणार आहे. याप्रकरणातील मुख्य सूत्रधार कोण? याचा शोध लागला पाहिजे. 22 ते 30 वर्षांच्या दरम्यानच्या तरुणांना असे प्रशिक्षण दिले जाते. त्यांच्याकडे नोकरी नाही तरी त्यांच्याकडे पैसा आहे. बाईक आहेत, आयफोन आहेत हा पैसा कुठून येतो? महिलांवर बलात्कार, फसवणूक व नशेखोरीचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.
संभाजीनगर हे गेल्या अनेक वर्षांपासून अतिरेकी कारवायांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे इम्तियाज जलील यांची देखील चौकशी झाली पाहिजे. हे एक मोठं षडयंत्र आहे. निदा खानला का उघड पाठिंबा दिला? तिच्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. इम्तियाज जलील यांनी मागे सुद्धा त्या संदर्भात उघडपणे वक्तव्य केले होते आणि एका अर्थाने तिला पाठिंबा दर्शविला होता.
नाशिकची निदा खान इतर कुठेही न जाता केवळ संभाजीनगरलाच का जाते? निदा खान संभाजीनगरमध्ये अशा परिसरात लपली होती, त्या परिसरात मोठी झोपडपट्टी आहे. तिथे अमली पदार्थांचे धंदे चालतात. शिवाय खान निदा खान एकटी नव्हती तर तिची आई आणि मावशी तिच्या सोबत होती. दहशतवादी हालचालींसाठी संभाजीनगर प्रसिद्ध आहे, या जिल्ह्याला अनेकदा संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आले आहे. हा विषय आपल्याला गांभीर्याने घ्यावा लागेल असे मंत्री शिरसाट म्हणाले.











