पुणे, प्रतिनिधी : जागतिक मातृ दिनानिमित्त पुण्यातील यशवंत क्लासेसच्या वतीने “विद्यार्थी हिताय पालक सुखाय” या विशेष व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेअंतर्गत जागतिक कीर्तीचे अंध उद्योजक, पॅराऑलिम्पिक गोल्ड मेडल विजेते आणि सनराईज कँडल्सचे संस्थापक डॉ. भावेश हसुमतीबेन चंदुभाई भाटिया यांचे “रुक् जाना नहीं…” हे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती यशवंत क्लासेसचे संस्थापक शीतल पाटील यांनी दिली.
हा कार्यक्रम रविवार, १० मे रोजी सकाळी ८.३० वाजता अण्णाभाऊ साठे सभागृह, सातारा रोड, पुणे येथे होणार आहे. स्वतः अंध असूनही हातगाडी विक्रेत्यापासून तब्बल ३५० कोटी रुपयांची उलाढाल असलेला उद्योग उभारणाऱ्या डॉ. भावेश भाटिया यांनी आपल्या सनराईज कँडल्स या उद्योगाच्या माध्यमातून १० हजारांहून अधिक अंध, दिव्यांग आणि अनाथ व्यक्तींना स्वावलंबनाचा मार्ग दिला आहे.
विद्यार्थ्यांचे आयुष्य बदलणारे आणि पालकांना आयुष्यभराची ऊर्जा देणारे हे व्याख्यान प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी आवर्जून ऐकावे, असे आवाहन शीतल पाटील यांनी केले आहे.
यशवंत क्लासेसच्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून “मातृनाम प्रथम” शपथ ग्रहण समारंभ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. जागतिक मातृ दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमामध्ये विद्यार्थी आपल्या नावामध्ये आईचे नाव प्रथम लावण्याची शपथ घेतात. तसेच सोशल मीडियावरील नावांमध्येही बदल करून आईच्या नावाचा सन्मान करतात.
याबाबत बोलताना शीतल पाटील म्हणाले की, “आईला अविस्मरणीय भेट देण्यासाठीचा हा विशेष कार्यक्रम आहे. विद्यार्थी आपल्या आईचे नाव अभिमानाने लावून तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची शपथ घेतात. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये कर्तृत्वाबरोबरच मातृभक्तीची जाणीव निर्माण करणारा आहे.”
या कार्यक्रमासाठी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव अण्णा सरस्वती धोंडिबा तापकीर, पुण्याचे माजी महापौर दत्तात्रय इंदुबाई बबनराव धनकवडे तसेच भूमाता ब्रिगेड आणि फाउंडेशनच्या अध्यक्षा तृप्तीताई संजीवनी प्रशांत देसाई हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
आईवर प्रेम करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने आणि पालकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन यशवंत क्लासेस आणि राष्ट्रशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.











