‘प्रस्तावित पुरंदर येथील छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादनाचा दर प्रति एकर एक कोटी ६१ लाख १ हजार ९२५ रुपये एवढा निश्चित करण्यात आला आहे. याशिवाय सहमतीने जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना दहा टक्के परतावा आणि कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिली जाणार आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी मंगळवारी दिली.
शेतकऱ्यांच्या खात्यावरती ७ मे पासून पैसे वर्ग करण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचे सांगून डूडी म्हणाले, ‘ज्या दिवशी करारनामा होईल त्याच दिवशी आरटीजीएसद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येतील. ही प्रक्रिया १० जून पर्यंत सुरू राहील. त्यानंतर उर्वरित जमिनी या सक्तीने भूसंपादित करण्यात येतील. प्रकल्पासाठी एकूण १,२१६ हेक्टर जमीन संपादित केली जाणार असून, सात गावांमधील मोजणी पूर्ण झाली आहे.
दर निश्चिती करताना परिसरातील प्रत्यक्ष खरेदी-विक्री व्यवहारांचा आधार घेतला गेला आहे. जमिनीव्यतिरिक्त विहिरी, बोअरवेल, घरे, शेड, झाडे आदी घटकांचे स्वतंत्र मूल्यांकन करून त्यावर दुप्पट मोबदला देण्यात येणार आहे. आंबा, चिंच, सीताफळ यांसारख्या फळझाडांसाठीही बाजारभावाच्या दुप्पट रक्कम दिली जाणार आहे.’











