सोळा वर्षांची मुलगी. हातात मोबाईल नाही म्हटलं की घरातला टीव्ही उंच इमारतीवरून खाली फेकते, मायक्रोवेव्ह फेकते, आईवर हात उगारते. हे पाहून हतबल झालेल्या पालकांनी शेवटी एक असा निर्णय घेतला जो कोणत्याही आई-बाबांना घ्यायची वेळ येऊ नये त्यांनी चार बाऊन्सर नेमले.
दोन शिफ्टमध्ये. चोवीस तास. महिन्याला 65,000 रुपये खर्च करून.गुजरातची राजधानी अहमदाबादेत घडलेली ही घटना आता केवळ एका कुटुंबाची व्यथा राहिलेली नाही ती एका मोठ्या, भयावह सामाजिक संकटाचा चेहरा बनली आहे.
मानसोपचार तज्ज्ञ डॉ. मृगेश वैष्णव यांनी या मुलीबद्दल सांगितलं की ती एका फोटो-शेअरिंग प्लॅटफॉर्मवर अत्यंत आक्रमकपणे सक्रिय होती. सतत फोटो पोस्ट करणं, अनोळखी लोकांशी गप्पा मारणं, आणि हळूहळू सोशल मीडियावर ओळखी झालेल्या लोकांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी घरातून लपून बाहेर पडणं हे सारं जेव्हा पालकांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी फोन काढून घेण्याचा प्रयत्न केला.
फोन नाही म्हटल्यावर मुलगी एकदम बदलली. घरातील वस्तू उंचावरून खाली फेकल्या, आईवर हात उगारला. औषधोपचारासोबत कडक नियंत्रण ठेवणं आवश्यक झालं, असं डॉ. वैष्णव सांगतात. मुलीच्या आईने सांगितलं की गेल्या काही महिन्यांपासून व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेचा भाग म्हणून ते बाऊन्सर ठेवत आहेत.
सेलिब्रिटींच्या संरक्षणासाठी किंवा गर्दी नियंत्रणासाठी ओळखले जाणारे बाऊन्सर आता घराघरांत पोहोचत आहेत आणि त्यांचं काम आहे व्यसनाधीन किशोरवयीन मुलांवर नजर ठेवणं.
सुरतमध्ये Force11 सिक्युरिटी कंपनीचे प्रमुख निखिल पांडे यांनी एका वेगळ्याच प्रकरणाबद्दल सांगितलं. एका १७ वर्षीय मुलाला गेमिंगचं व्यसन होतं. राग आला की तो घरातल्या पाळीव कुत्र्यावर काढायचा आणि बेदम मारायचा. कुत्रा वडिलांना अतिशय प्रिय होता. त्याच्या संरक्षणासाठी चक्क नऊ महिने दोन शिफ्टमध्ये आठ बाऊन्सर तैनात करण्यात आले.
व्यसनाधीन किशोरांवर लक्ष ठेवणं ही आता नवीन मागणीची श्रेणी बनली आहे, असं सुरतमधील सुरक्षा एजन्सीचे संचालक यासीन मलिक सांगतात. त्यांच्या एजन्सीला अलीकडेच एका रिअल इस्टेट डेव्हलपरच्या मुलाच्या पुनर्वसनानंतर त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी नेमण्यात आलं होतं पुन्हा व्यसनाच्या पदार्थांपर्यंत पोहोचू नये यासाठी. आठ तासांच्या शिफ्टसाठी प्रत्येक बाऊन्सरला दररोज 1,500 रुपये दिले जातात. आणि आता एजन्सी या कर्मचाऱ्यांना मुलांशी संवेदनशीलतेने वागण्याचं विशेष प्रशिक्षणही देऊ लागल्या आहेत.
वडोदऱ्यात अशफाक कपाडिया यांच्या टीमला एका कुटुंबाने नेमलं होतं. त्यांचा मुलगा ड्रग्सच्या व्यसनाधीन होता. पैसे न दिल्यास तो शिवीगाळ करायचा, आक्रमक व्हायचा. काही काळ आमची टीम तैनात केली, त्यानंतर त्या तरुणाने सुधारण्याचं आश्वासन दिलं, असं ते सांगतात. अशा सेवांसाठी दररोज 1,000 ते 5,000 रुपये खर्च होतो.
राजकोटमध्ये केयूर उनाडकट यांच्या एजन्सीकडे येणाऱ्या मागण्या आणखी वेगळ्या आहेत. बेफाम वाहन चालवणं, रस्त्यावर भांडणं, हनीट्रॅपसारख्या धोकादायक परिस्थितींमध्ये अडकणाऱ्या मुलांवर नजर ठेवण्यासाठी पालक बाऊन्सर नेमत आहेत. त्यांच्या ग्राहकांमध्ये राजकारणी आणि उद्योगपतींचा समावेश आहे. काही वेळा अशी मागणी असते की मुलांनाही कळू नये आणि गुप्तपणे नजर ठेवली जावी. मद्यपान नको, भांडणं नको, चुकीची संगत नको एवढीच माफक अपेक्षा असते, असं ते सांगतात.
अहमदाबादमधील अभयम हेल्पलाईनचे समन्वयक सतीश काडिया यांनी सांगितलं की कोविडनंतर स्क्रीन व्यसन आणि हिंसक वर्तनाशी संबंधित कॉल्समध्ये मोठी वाढ झाली आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये फोन काढून घेतल्यावर मुलं स्वतःला इजा करतात किंवा पालक, मित्र आणि कुटुंबीयांवर आक्रमक होतात असं ते सांगतात.
डॉ. वैष्णव यांच्या मते अभ्यासासाठी लवकर दिलं जाणारं स्मार्टफोन हे मुलांसाठी व्यसनाचं साधन ठरत आहे. कारण ते त्यातून मनोरंजन आणि ‘व्हॅलिडेशन’ म्हणजेच दुसऱ्यांची मान्यता शोधतात. स्क्रीन व्यसनातून बाहेर पडण्यासाठी किशोरवयीन मुलांना एक ते चार महिने रुग्णालयात दाखल करावं लागतं, असं ते सांगतात. त्यांच्या मते ड्रग्स आणि मद्याप्रमाणेच हे एक नवीन, गंभीर प्रकारचं व्यसन आहे; जिथे पारंपरिक उपाय प्रभावी ठरत नाहीत.
मानसिक आरोग्य तज्ज्ञांच्या मते या घटना कोविडनंतर व्यसनाशी संबंधित गंभीर वर्तन समस्यांमध्ये झालेल्या वाढीचं प्रतिबिंब आहेत.
सुरक्षा एजन्सींच्या माहितीनुसार अशा प्रकारच्या देखरेखीवर कुटुंबे महिन्याला 50,000 रुपयांपेक्षा अधिक खर्च करतात. पूर्वी व्हीआयपी संरक्षण आणि कार्यक्रमांपुरती मर्यादित असलेली ही सेवा आता सामान्य घरांमध्येही पोहोचत आहे.
एक मुलगी, चार बाऊन्सर, महिना पासष्ट हजार रुपये हे आकडे पाहताना मन सुन्न होतं. पण यापेक्षाही जड असेल ते त्या आई-बाबांचं मन, जे आपल्या मुलाला सांभाळण्यासाठी आता दुसऱ्याच्या हातावर विसंबून राहणं हाच एकमेव पर्याय असल्याचं समजून बसले आहेत.











