May 14, 2026 11:55 pm

१३व्या वर्षी लग्नानंतर नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांना स्वीकारावा लागला इस्लाम धर्म

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मनोरंजनविश्वात असे अनेक सेलिब्रिटी होऊन गेलेत ज्यांनी स्वबळावर इंडस्ट्रीत आपल्या कलेच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण केली. आज ते हयात नसतानाही त्यांच्याप्रति प्रेक्षकांमध्ये आदर आहे.

सरोज खान यांनी इंडस्ट्रीतील अनेक बड्या स्टार्सला नृत्य शिकवलं वेळप्रसंगी अनेकांची चांगलं काम करुन घेण्यासाठी कान उघडणीही केली. म्हणूनच काही सेलिब्रिटी कामाच्या बाबतीत सरोज खान खूप कडक शिस्तीच्या होत्या असंही म्हणतात. पण, तुम्हाला माहीत आहे का? पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन व्हावं यासाठी पडद्यामागे कलाकारांकडून मेहनत करून घेणाऱ्या सरोज खान यांचं आयुष्य अनेक आव्हानांनी भरलेलं होतं. आर्थिक अडचण, लहान वयात झालेलं लग्न ते धर्मांतर अशा अनेक गोष्टींमुळे त्यांचं खासगी आयुष्य खूप खडतर बनलं.

‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार भारतातील अतिशय कठीण काळात निर्वासित कुटुंबात सरोज खान यांचा जन्म झाला, त्यामुळे त्यांचं आयुष्य कधीच सोपं नव्हतं. अवघ्या १३ व्या वर्षी त्यांचं लग्न झालं. काही वर्षांनी त्यांना कळलं की ते लग्न कायदेशीर नव्हतं. आपल्या मुलांच्या भविष्यासाठी त्यांनी धर्मांतर केलं. आयुष्यात अनेक मोठ्या वैयक्तिक दुःखांचा सामना केला आणि प्रत्येक संकटाशी लढत राहिल्या. तरीही, या सगळ्यावर मात करत त्या भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध कोरिओग्राफरपैकी एक बनल्या.

सरोज खान यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. फक्त तीन वर्षांच्या असताना त्या आपल्या सावलीकडे पाहून स्टेप्स करायच्या. त्यांचं हे वेगळं वागणं पाहून आई-वडिलांना काळजी वाटली आणि ते सरोज यांना डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी त्यांचं निरीक्षण करून स्पष्ट सांगितलं, त्या आजारी नाही आहेत तर त्या फक्त नाचत आहे. डॉक्टरांच्या चित्रपटसृष्टीत ओळखी असल्याने त्यांनी सरोज यांच्या आई-वडिलांना त्यांना बालकलाकार म्हणून काम करू देण्याचा सल्ला दिला.

यामुळेच, अवघ्या तीन वर्षांच्या असताना सरोज खान यांनी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. सरोज खान यांनी लहानपणी ‘मजबुरी’ सारख्या अनेक चित्रपटांत बालकलाकार म्हणून काम केलं. पण, त्या मोठ्या होत गेल्या तशा कामाच्या ऑफर्स कमी झाल्याय. याच काळात त्यांच्यावर मोठं संकट ओढवलं. त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या लहान खांद्यावर आली. एका कार्यक्रमात बोलताना सरोज खान याबद्दल म्हणालेल्या, “माझ्या वडिलांचं निधन झालं होतं, त्यामुळे घर चालवण्याची जबाबदारी माझ्यावर आली. मी ग्रुप डान्सर म्हणून काम सुरू केलं. मी शिक्षण घेत होते आणि डॉक्टर बनायचं स्वप्न होतं, पण देवाची काही वेगळीच योजना होती.”

एका चित्रपटात अभिनेत्री हेलेन यांच्याबरोबर नाचताना सरोज खान यांनी फक्त स्वतःचेच नव्हे तर हेलनचे स्टेप्सही सादर केले. हे पाहून नृत्य दिग्दर्शक सोहनलाल यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. त्यांनी तिला पुढे बोलावलं आणि विचारलं की तिला सगळ्यांची कोरिओग्राफी येते का. सरोज यांनी आत्मविश्वासाने होकार दिला. त्यानंतर त्यांनी सरोज यांना संपूर्ण गाणं सादर करायला सांगितलं आणि त्यांनी ते उत्तमरीत्या केलं. त्या दिवशी, अवघ्या १२ व्या वर्षी, सरोज खान सोहनलाल यांच्या सहाय्यक बनल्या. त्यावेळी त्यांना कदाचित माहित नव्हतं, पण हा क्षण त्यांच्या आयुष्याला नवं वळण देणारा ठरला.

सोहनलाल जे सरोज यांच्यापेक्षा तब्बल ३० वर्षांनी मोठे होते ते सरोज खान यांचे फक्त गुरुच नव्हते, तर त्यांच्या आयुष्यात खास स्थान मिळवून गेले. अवघ्या १३ व्या वर्षी, त्यांनी सरोज यांच्या गळ्यात काळा दोरा बांधला आणि सरोज यांना वाटलं की त्यांचं लग्न झालं आहे. १४ व्या वर्षी त्या आई बनल्या. पण काही काळानंतर त्यांना एक मोठा धक्का बसला. सोहनलाल आधीच विवाहित होते आणि त्यांना चार मुलंही होती. म्हणजेच, सरोज यांचं लग्न कायदेशीर झालेलं नव्हतं.

‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “मला त्या वेळी लग्नाचा अर्थच कळत नव्हता. एक दिवस त्यांनी माझ्या गळ्यात काळा दोरा बांधला आणि मला वाटलं की माझं लग्न झालं.” त्यामुळे अवघ्या लहान वयातच सरोज यांना आपल्या मुलांचा सांभाळ करावा लागला, तर ज्या व्यक्तीवर त्या प्रेम करत होत्या, त्यांनी त्या मुलांना आपलं नाव देण्यास नकार दिला.

१९७५ मध्ये सरोज खान यांची सरदार रोशन खान यांच्याशी ओळख झाली. त्यांनी लग्नाचा प्रस्ताव दिला. सरोज यांनीसुद्धा होकार दिला, पण एका अटीवर. सरोज यांची अट अशी होती की सरदार रोशन खान यांनी त्यांच्या मुलांना त्यांनी दत्तक घ्यावं आणि त्यांना आपलं नाव द्यावं. रोशन खान यांनी ही अट मान्य केली. त्यानंतर लग्नासाठी सरोज, जन्माने पंजाबी होत्या, पण त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला आणि अशा व्यक्तीबरोबर आयुष्याची नवी सुरुवात केली, ज्याने त्यांच्या मुलांना स्वतःचं नाव दिलं.

सरोज खान यांनी कधीच कोरिओग्राफर बनण्याचं स्वप्न पाहिलं नव्हतं. त्या सहाय्यक म्हणूनच काम करण्यात समाधानी होत्या. पण पुन्हा एकदा नशिबाने वेगळं वळण दिलं. सोहनलाल एका चित्रपटाच्या शूटदरम्यान परदेशात गेल्यामुळे काम अर्धवट सोडून गेले. त्यामुळे निर्मात्यांनी सरोज यांना ‘दिल ही तो है या चित्रपटाची कोरिओग्राफी करायला सांगितली. सुरुवातीला त्यांनी थोड्या संकोचाने हे काम स्वीकारलं, पण त्या यात यशस्वी ठरल्या. यानंतर अभिनेत्री साधना यांनी त्यांना ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटासाठी स्वतंत्र काम दिलं. यामुळे सरोज खान यांना कोरिओग्राफर म्हणून पहिला मोठा ब्रेक मिळाला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!