May 14, 2026 11:57 pm

पुण्यातील गंगाधाम रस्त्यावर मध्यरात्री गॅस गळती, 24 जणांना त्रास

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुण्यातील मार्केटयार्डातील गंगाधाम-बिबवेवाडी रस्त्यावरील एका रासायनिक कंपनीच्या सिलेंडरमधून क्लोरीन हा गॅस गळती झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गॅस गळतीमुळे भागातील तब्बल २४ नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले.

सुदैवाने नागरिकांच्या जिवावर हा प्रकार बेतला नाही. मात्र, गॅस गळतीचा प्रचंड त्रास नागरिकांना सहन करावा लागला. यामध्ये अग्निशमन दलाच्या एका अधिकाऱ्यासह जवान देखील जखमी झाले.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेऊन गॅस गळती रोखल्याने मोठा अनर्थ देखील टळला आहे. याप्रकरणी पोलिसांनी जागा मालक व मॅनेजरवर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. गॅस गळती प्रकरणी जागा मालक प्रकाश बाबुराव मुथा आणि मॅनेजर साहिल हमीद मुलानी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २८६, १२५, १२५(अ) आणि प्रदूषण कायदा कलम ७, ८, १५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अश्पाक सय्यद (वय ३०) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रकाश मुथा यांची गंगाधाम बिबवेवाडी रस्त्यावरील वर्धमान लॉन्सच्या समोर मोकळी जागा आहे. ही मोकळी जागा प्रकाश मुथा यांची असून, त्याठिकाणी पत्र्याच्या शेडमध्ये पुणे महापालिकेला पुरविण्यात येणारा क्लोरीन या गॅसची कंपनी आहे. कंपनीचे काही मोठे सिलेंडर मोकळ्या जागेत ठेवण्यात आले होते. क्लोरीन गॅस पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यासाठी वापरला जातो.

दरम्यान, मध्यरात्री साडे बाराच्या सुमारास एका टाकीमधून क्लोरीन गॅस लिकेज झाला. टाकीत विषारी वायू तयार होऊन हा क्लोरीन गॅस गळती झाला. त्यामुळे काही वेळातच परिसरातील नागरिक व रहिवाशांना त्याचा त्रास होण्यास सुरूवात झाली. ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुलांना श्वास घेण्यास प्रचंड वेदना होऊ लागल्या. तेव्हा हा प्रकार समोर आला. लागलीच याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. तोपर्यंत या गॅसमुळे तब्बल २४ नागरिकांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. काहींना ससून रुग्णालय तर काहींना कात्रजमधील एका खासगी रुग्णालयात दाखल केले गेले. यामध्ये ८ महिला, ६ मुले तसेच ५ पुरूषांचा समावेश आहे. यामुळे गॅस गळतीमुळे या भागात नागरिकांना त्रास सोसावा लागला. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली नाही.

गॅस गळतीमुळे नागरिकांचे डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास जाणवल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना याचा प्रचंड त्रास झाला. सुरूवातीलाच ज्येष्ठांना त्रास जाणवू लागला. याठिकाणी मोठ्या गॅसच्या टाक्या आहेत. एका टाकीतून हा गॅस गळती झाला होता. दिवसभर तीव्र उन्ह सुरू आहे. त्यामुळे विषारी वायू होऊन तो गळती झाला असावा असा अंदाज आहे.

अग्शिशमन दलाच्या जवानांनी सुरक्षाविषयक उपकरणे परिधान (बीए सेट) करुन आधिकारी आणि जवान कंपनीत शिरले. त्यांनी तातडीने गॅस गळती रोखली. नागरिकांना त्रास जाणवू लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे अधिकारी आणि जवानांनी तातडीने नागरिकांना ससून रुग्णालयात रुग्णवाहिकेतून दाखल केले होते. तेव्हा हा गॅस बंद करत असताना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यासह जवानाला देखील त्रास झाला. अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पाच अधिकारी आणि ३० जवान मदतकार्यात सहभागी झाले होते.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!