विधान परिषदेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने बुधवारी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
दानवेंच्या उमेदवारीमुळे काँग्रेस पक्षात संतप्त प्रतिक्रिया उमटली असून, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या निवडणुकीत पक्षाचा उमेदवार देण्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीतून उमेदवाराच्या नावावर खल सुरु असून पार्थ पवार यांनी सुचवलेल्या नावाला ‘देवगिरी’वर झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी विरोध केल्याची माहिती आहे.
विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी येत्या १२ मे रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज, गुरुवारी शेवटची मुदत आहे. या निवडणुकीत उमेदवाराला पहिल्या फेरीत निवडून येण्यासाठी २९ मतांची गरज आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपचे पाच, शिवसेना पक्षाचे दोन; तर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक; तसेच विरोधी पक्षांच्या महाविकास आघाडीचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो.
विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अद्याप आपले उमेदवार जाहीर केलेले नाहीत. मात्र, ‘राष्ट्रवादी’कडून झिशान सिद्दीकी यांचे नाव नक्की झाल्याचे समजते. खासदार पार्थ पवार यांचा कल विक्रम काकडे यांना उमेदवारी देण्याकडे होता. मात्र, बुधवारी सकाळी ‘देवगिरी’ येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत काकडे यांच्या नावाला सर्वच ज्येष्ठ नेत्यांनी विरोध केला.
महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षाने उद्धव यांच्या उमेदवारीचा आग्रह धरला होता. त्यासाठी हर्षवर्धन सपकाळ यांनी ठाकरे यांची भेट घेतली होती. उद्धव उमेदवार असतील तर काँग्रेस पाठिंबा देईल; अन्यथा काँग्रेस उमेदवार देईल, असे सकपाळ यांनी जाहीर केले होते. विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून उद्धव ठाकरे हेच आघाडीचे उमेदवार असतील, असे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, नेते आदित्य ठाकरे यांनी दानवे यांच्या उमेदवारीची घोषणा करून पक्षातील नेत्यांना; तसेच काँग्रेसलाही धक्का दिला.
उमेदवार जाहीर करताना ‘उबाठा’ने आम्हाला विश्वासातच घेतले नाही आणि चर्चाही केली नाही. ‘उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर आम्ही सहकार्य करू अशी आमची भूमिका होती,’ अशा शब्दांत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, काँग्रेसने दिल्लीतून निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या ए अर्जाची प्रत प्रदेश कार्यालयात रवाना केली असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीवरून महाआघाडीत रण पेटण्याची चिन्हे आहेत.
या पार्श्वभूमीवर, काँग्रेसमध्ये हालचालींना वेग आला आहे. प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी काँग्रेसचा उमेदवार देणार असल्याचे जाहीर केल्याने ही माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
अंबादास दानवे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केल्यानंतर शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर उद्धव ठाकरे यांना ओवाळतानाचा व्हिडिओ शेअर केला. त्यासोबत त्यांनी, ‘आमदारकी, खासदारकी आपल्यावरून शंभर वेळा कुर्बान’ अशी ओळ दिली. त्यानंतर पक्षनेतृत्वाकडून त्यांची समजूत घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे.











