पुणे शहरातील बुधवार बुधवार पेठ परिसरात सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर फरासखाना पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी धंद्यांसाठी वापरण्यात येणारे 4 फ्लॅट तब्बल एक वर्षासाठी सील केले आहेत.
छाप्यात पोलिसांनी भारतात बेकायदेशीररीत्या वास्तव्य करणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे शहरात सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीचे धागेदोरे पुन्हा एकदा समोर आले आहेत.
पुण्यातील बुधवार पेठ हा रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जातो. अलीकडच्या काळात या भागात अनेक फ्लॅट्स आणि जुन्या वाड्यांमध्ये चोरट्या मार्गाने आणि कायद्याचे उल्लंघन करून कुंटणखाने चालवले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. फरासखाना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, दाणे आळी, न्यू वेलकम आणि बेगम परिसरात काही इमारतींमध्ये अवैध व्यवसाय सुरू होता. या माहितीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी विशेष पथकाची स्थापना केली आणि सापळा रचला.
समोर आलेल्या माहितीनुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणांवर छापा टाकला असता, तिथे धक्कादायक वास्तव समोर आले. या कारवाईत 3 महिला आढळून आल्या ज्या मूळच्या बांगलादेशी नागरिक आहेत. त्यांच्याकडे भारतात वास्तव्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. एजंटमार्फत या महिलांना पुण्यात आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात होता. पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेत पुढील कारवाई सुरू केली आहे.
वेश्या व्यवसायासाठी वापरण्यात येणारे चारही फ्लॅट प्रशासनाने एक वर्षासाठी सील केले आहेत. ताब्यात घेतलेल्या महिलांची सखोल चौकशी सुरू असून, त्या कोणाच्या माध्यमातून सीमा ओलांडून पुण्यात पोहोचल्या, याचा शोध पोलीस घेत आहेत. या कारवाईमुळे बुधवार पेठेतील अवैध लॉजिंग आणि कुंटणखाने चालवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सध्या या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांचा शोध पोलीस घेत असून या कारवाईमुळे पुण्यातील अवैध वेश्या व्यवसायाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.











