May 15, 2026 12:01 pm

पुण्यातील हांडेवाडीत लहान मुलींना गाडीत बसवून नेण्याचा प्रयत्न

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

हांडेवाडी येथील फॉर्च्युन इंप्रेस सोसायटीमध्ये एकाच वेळी धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. सोसायटीत खेळणाऱ्या लहान मुलींना परवानगीशिवाय गाडीत बसवून बाहेर नेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या प्रकाराला आक्षेप घेतल्यावर संबंधित व्यक्तीसह त्याच्या साथीदारांनी दोन भावंडांना बेदम मारहाण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे सोसायटीतील सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

शुभम बाचकर, किरण पवार श्रावण मोडक व एका अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणेश पांडुरंग गायकवाड (वय 27) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी गणेश गायकवाडहे आपल्या कुटुंबासह फॉर्च्युन इंप्रेस सोसायटी, हांडेवाडी येथे वास्तव्यास असून ते वाघोली येथील लेक्सिकॉन इंटरनॅशनल स्कूलमध्ये क्लार्क म्हणून नोकरी करतात.

रविवारी (ता.26 एप्रिल) सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांच्या बहिणीची चार वर्षांची मुलगी गार्गी ही सोसायटीच्या पार्किंगमध्ये इतर मुलांसोबत खेळत होती. त्यावेळी गणेश गायकवाड तिच्यावर लक्ष ठेवून होते. अचानक गार्गी दिसेनाशी झाल्याने त्यांनी घाईघाईने तिचा शोध सुरू केला. शोध घेत असताना सोसायटीत राहणारा शुभम बाचकर हा आपल्या कारमध्ये गार्गी आणि आणखी एका मुलीला बसवून गेटच्या दिशेने निघालेला दिसला.

परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच गायकवाड यांनी आपल्या मोठ्या भावाला संतोष याला गाडी अडवण्यास सांगितले. गेटवर गाडी थांबवून त्यांनी आरोपीला जाब विचारला असता “मुलींना आईस्क्रीम खायला घेऊन जात होतो,” असे उत्तर देत त्याने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपी मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करत गायकवाड बंधूंनी त्याला रोखले. यावरून वाद चिघळत गेला आणि परिस्थिती तणावपूर्ण बनली. त्याचवेळी सोसायटीतीलच किरण पवार, त्याचा साथीदार श्रावण मोडक आणि एक अनोळखी इसम घटनास्थळी आले. त्यांनी उलट गायकवाड बंधूंनाच दमदाटी करत शिवीगाळ सुरू केली.

वाद वाढताच, श्रावण मोडक याने गणेश गायकवाड यांना बेल्टने बेदम मारहाण केली, तर अनोळखी इसमाने वॉचमनच्या काठीने आणि छत्रीच्या दांड्याने हल्ला केला. गणेश यांचा भाऊ संतोष हा त्यांना वाचवण्यासाठी पुढे आला असता किरण पवार याने त्याला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता “जिवे मारून टाकतो” अशी धमकी देत चौघेही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेनंतर घाबरलेल्या नागरिकांनी 112 नंबरवर फोन केला. तत्काळ फुरसुंगी पोलिसांचे मार्शल पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमी भावंडांना उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या प्रकरणी शुभम बाचकर, किरण पवार, श्रावण मोडक आणि एका अनोळखी इसमाविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम 115(2), 118(1), 3(5), 351(2), 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!