येथील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ विद्यालयाची माजी विद्यार्थिनी यशश्री पाटील हिने अमेरिकेत शिक्षण घेत असतानाच मॉस असोसिएट कंपनीकडून प्रकल्प अभियंता पदासाठी १ कोटी ११ लाख रुपयांचे पॅकेजवर नोकरी प्राप्त केली आहे.
धरणगाव परिसरात एवढ्या मोठ्या पॅकेजवर काम करणारी यशश्री ही पहिलीच विद्यार्थिनी ठरली आहे.यशश्री ही इंदिरा गांधी विद्यालयाचे पर्यवेक्षक ए. एस. पाटील व विजया पाटील (मूळ रा. नेवाडे, ता. शिंदखेडा) यांची कन्या आहे. लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धमत्ता असलेल्या यशश्रीला इतरांपेक्षा काही तरी वेगळे करण्याचा ध्यास होता. दहावीनंतर तिने धुळे येथील शासकीय डिप्लोमा महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. त्यानंतर धुळे येथील एस. एस. व्ही. पी. एस. इंजिनिअरिंग महाविद्यालयातून बी. ई. सिव्हिलचे शिक्षण पूर्ण केले.
याच काळात यशश्रीच्या नावावर पेटंट फाइल केले गेले. आडवा, तिडवा असलेल्या बांबूला सौरऊर्जेच्या माध्यमातून सरळ करण्यासाठीचे हे पेटंट होते. यामुळे यशश्रीसह महाविद्यालयाचा देखील नावलौकिक वाढला होता. यशश्रीच्या या पेटंटच्या डीव्हाईसची मुंबई ‘आयआयटी’च्या स्टार्टअपसाठी निवड केली गेली. शिवाय इंटरनॅशनल रिसर्च पेपर देखील तिचे प्रकाशित झाले. आत्मविश्वास आणि महत्त्वकांक्षेच्या बळावर बी. ई. झाल्यानंतर एम. एस. करण्यासाठी ती अमेरिकेत गेली. तेथील साऊथ कॅरोलिना विद्यापीठात तिने शिक्षण पूर्ण केले.
विद्यापीठात पहिल्या दोन सेमिस्टरमध्येच यशश्रीने आपल्या अभ्यासातून चुणूक दाखवली. यामुळे मॉस या कंपनीतच तिला इंटर्नशीपसाठी संधी मिळाली. कंपनीत काम करत असताना तिची जिद्द, आत्मविश्वास आणि ती घेत असलेला सतत नाविन्यतेचा ध्यास पाहून कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिला कंपनीतच नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली. भविष्यात आपल्या कंपनीसाठी यशश्रीचे योगदान निश्चितच फायदेशीर ठरेल, असा विश्वास कंपनीच्या अधिकाऱ्यांना वाटला.
त्यानुसार, तिला कंपनीत कायमस्वरूपी नोकरीची संधी देऊ केली. त्यासाठी तब्बल एक कोटी अकरा लाख रुपयांचे पॅकेज तिला मिळाले. यशश्रीच्या या उत्तुंग भरारीने आई- वडील आणि परिवाराच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू होते.
यशश्रीच्या या यशाबद्दल तिचे इंदिरा गांधी विद्यालयाच्या प्राचार्य सुरेखा पाटील, संस्थेचे अध्यक्ष डी. जी. पाटील, सचिव सी. के. पाटील, धुळे येथील इंजिनियरिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हितेंद्र पाटील, प्रा. डॉ. एस. डी. सूर्यवंशी, पाटबंधारे विभागात अभियंता असलेले यशश्रीचे भाऊ सुजित पाटील, पी. आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. एस. पाटील, धरणगाव बाजार समितीचे उपसभापती सुदाम पाटील, धुळे येथील संजीव पाटील, वर्षा पाटील, नीतेश साळुंखे यांच्यासह अनेकांनी तिचे कौतुक केले.











