April 24, 2026 4:10 pm

घाटात बेवारस बाईक दिसली अन् संशय बळावला

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात पुन्हा एकदा भीषण अपघात घडून बाईकस्वार दांपत्याचा सुमारे ७०० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना 23 एप्रिल रोजी सायंकाळी घडली.

दाट धुके, निसरडा रस्ता आणि घाटातील धोकादायक वळण यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता व्यक्त केली जात असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंबेनळी घाटातील अतिधोकादायक वळणावर स्प्लेंडर बाईक बॅरिकेट्समध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आली. त्यामुळे बाईकवरील प्रवासी दरीत कोसळल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. यानंतर तात्काळ प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली.

शोधकार्यादरम्यान सुमारे ७०० फूट खोल दरीत मोहन चव्हाण (वय ५५) आणि जयश्री चव्हाण (वय ४८, रा. सोनगिरवाडी) यांचे मृतदेह आढळून आले. या दुर्घटनेमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

दरम्यान, घटनास्थळी अवकाळी पाऊस, दाट धुके आणि निसरडा उतार यामुळे बचावकार्य अत्यंत कठीण झाले. कमी दृश्यमानता आणि खोल दरीमुळे रेस्क्यू टीमला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. प्रतापगड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्य जीव धोक्यात घालून मृतदेह बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

या घटनेनंतर पोलादपूर व महाबळेश्वर पोलीस यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून बचावकार्याला मदत केली. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून संपूर्ण परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.

आंबेनळी घाट हा अतिधोकादायक वळणांचा आणि खोल दऱ्यांचा घाट म्हणून ओळखला जातो. विशेषतः पावसाळ्यात रस्ता निसरडा होत असल्याने अपघातांचा धोका वाढतो. त्यामुळे वाहनचालकांनी वेग मर्यादित ठेवावा, सतर्कता बाळगावी आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!