मागील काही दिवसांपासून राज्यात अशोक खरात प्रकरण चांगलंच गाजत आहे. अशोक खरात याने भविष्य सांगण्याच्या बहाण्याने आणि पूजा विधी करण्याच्या नावाखाली अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे.
या प्रकरणी त्याच्यावर एकूण १६ गुन्हे दाखल झाले आहेत. त्याने शेकडो लोकांची आर्थिक फसवणूक केल्याचा देखील आरोप आहे. हे प्रकरण ताजं असताना आता नाशिकमध्ये आणखी एक अत्याचाराचं प्रकरण उघडकीस आलं आहे.
या प्रकरणी नाशिकच्या लासलगावमधील आणखी एका भोंदूविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर एका महिलेनं लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. महेश गिरी असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपी भोंदूबाबाचं नाव आहे. त्याच्याविरोधात जादूटोणा विरोधी कायदा आणि बलात्काराच्या कलमांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील धरणगाव (खडक) येथे मठ आहे. हा मठ प्रति गणगापूर म्हणून प्रसिद्ध आहे. इथे दररोज शेकडो लोक येतात. विविध कौटुंबीक आणि वैयक्तीक समस्यांवर तोडगा काढण्याच्या बहाण्याने आरोपी भोंदू विविध कुटुंबाला जाळ्यात ओढत होता. आरोपीनं अशाच प्रकारे पीडितेच्या कुटुंबीयांना जाळ्यात ओढलं होतं.
त्याने कुटुंबाला बाधा झाली असल्याचं सांगत पापनाशक कुंडात अंघोळ करायला भाग पाडलं होतं. तसेच झाडाला फेऱ्या मारायला सांगितल्या होत्या. यानंतर आरोपी भोंदूनं पीडित महिलेचा मोबाईल नंबर घेऊन तिला अश्लील मेसेज पाठवण्यास सुरुवात केली. तसेच दैवी विधीच्या नावाखाली एकांतात नेण्याचा बहाणा केला. यानंतर त्याने नाशिक-त्र्यंबक रोडवरील लॉजवर नेऊन पीडितेचं लैंगिक शोषण केलं. त्याने दैवी प्रकोप होण्याची भीती दाखवत अत्याचार केल्याचा आरोप महिलेनं केला आहे.
ज्यावेळी पीडितेनं विरोध केला, तेव्हा आरोपीनं जबरदस्ती राक्षसासारखा अत्याचार केला. आपण प्रतिकारही करू शकलो नाही, असं पीडितेनं सांगितलं आहे. या प्रकारानंतर पीडितेने अंनिस पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यानंतर हे धक्कादायक कांड उघडकीस आलं. पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनंतर लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भोंदूकडून अनेक महिलांचे शोषण झाल्याची शक्यता पीडित महिलेनं वर्तवली आहे.










