चार वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या व्यक्तीची हत्या करून बॉडी एका हॉटेलमागे जमिनीत सिमेंट कॉंक्रिटमध्ये गाडण्यात आली. ज्या आरोपीने ही ‘दृश्यम’स्टाइल हत्या केली, त्याच्या पत्नीनेच त्याचे बिंग फोडले.
मेहकर ते मोळा मार्गावर जामगाव शिवारात मंगळवारी पहाटे पोलिसांनी खड्डा उकरला असता त्यामध्ये मानवी सांगाडा आढळला. याप्रकरणी मेहकर पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना अटक केली आहे. ही हत्या का करण्यात आली, याची कसून चौकशी केली जात आहे.
विनोद आश्रूबा नवले, असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तो मेहकर तालुक्यातील सुकळी येथील रहिवासी होता. त्याचे हत्याकांड घडविणारा सचिन ज्ञानेश्वर उगले हा मुख्य आरोपी आहे. त्याने सुनील बाजीराव जाधव (सुकळी) च्या मदतीने कैची व चाकूने गळ्यावर, छातीवर वार करून हत्या केल्याची कबुली पोलिसांना दिली.
आरोपी सचिनची मेहकरला राहणारी पत्नी १७ एप्रिल रोजी मेहकर पोलिसांत पतीविरुद्ध तक्रार देण्यासाठी गेली होती. पती त्रास देत असल्याची तिची कैफियत होती. पतीविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद असल्याचे व चार वर्षांपूर्वी सुकळी गावातील एकाचा घातपात केल्याचा संशय पोलिसांसमोर व्यक्त केला होता. पती त्रास देताना या गोष्टी बोलायचा. दरम्यान, पोलिसांनी कसून तपास सुरू केला. तसेच पुरावे जमा करायला सुरुवात केली. सचिन उगले व सुनील जाधव या दोघांवरही पाळत ठेवण्यात आली. यानंतर या गुन्ह्याची उकल झाली.
२ मे २०२२ रोजी दुपारी सुनील जाधव याच्या मदतीने विनोद नवले याचा मेहकर ते मोळा रोडवरील रहेमान उर्फ बाबा भिकू कुरेशी याच्या जामगाव शिवारातील शेतातील हॉटेल पैलवानमध्ये दारू पाजून हत्या केल्याची व हॉटेल मागे खड्डा खोदून पुरल्यानंतर त्यावर सिमेंटचा कोबा केल्याची कबुली आरोपी उगले याने पोलिसांना दिली. आरोपींना घेऊन खड्डा उकरण्यात आला असता मृताचा सांगाडा आढळून आला. चार वर्षांपूर्वी बेपत्ता झालेल्या विनोदच्या हत्येचा गुन्हा उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.
पोलिस आपल्याबद्दल व साथीदाराविषयी चौकशी करीत असल्याची कुणकुण लागल्याने आरोपी सावध झाला. मात्र, आता आपला गुन्हा जास्त दिवस लपवू शकणार नसल्याची भीती वाटल्याने सचिन उगले हा मंगळवारी मेहकर पोलिसांना शरण आला.










