टिटवाळ्यामधील ड्रग्ज सप्लायर अश्विनी पॉलचा माग काढणे हे मुंबई पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. पण, पोलिसांनी एक भन्नाट आयडिया लढवली आणि अश्विनी सहज पोलिसांच्या जाळ्यात अडकली.अश्विनी पॉलपर्यंत पोलीस कसे पोहोचले यासंदर्भातील रंजक माहिती आणि संपूर्ण घटनाक्रम समोर आला असून हा घटनाक्रम एखाद्या क्राइम थ्रीलर चित्रपटाप्रमाणे आहे.
पोलीस कसे घरात घुसले?
पालिका सर्व्हेच्या नावाखाली टिटवाळा येथील पद्मावती कॉम्प्लेक्समध्ये पोलिसांनी एंट्री केली. याच सर्वेक्षणाच्या माध्यमातून सुरु असलेल्या गुप्त रेकीदरम्यान पोलिसांनी अश्विनीचे घर सापडले आणि लगेच छापा घातला, तेव्हा अश्विनीने स्वतःला ‘बार गर्ल’ असल्याचे सांगितले. पण, पोलिसांचे लक्ष घरातील कचऱ्याच्या डब्याकडे गेले. घराच्या कोपऱ्यात आसलेला आणि सहज लक्षात न येणारा हा कचऱ्याचा डबा उघडताच त्यात लपलेल्या 6 कोटींच्या 5 हजार एक्स्टसी गोळ्या पोलिसांनी दिसल्या आणि अश्विनीचा भांडाफोड झाला.
लिव्ह-इन पार्टनरच झाला क्राइम पार्टनर
चौकशीत अश्विनीचा लिव्ह-इन पार्टनर अमीर सय्यद तिच्या घरापर्यंत ड्रग्जचा पुरवठा करत होता असं समोर आलं आहे. तर अश्विनी या ड्रग्जची विक्री करायची. अमीर आणि अश्विनी दोघे मिळून हे रॅकेट चालवत होते. मंगळवारी रात्री उशिरा या प्रकरणामध्ये पोलिसांनी अमीरलाही अटक केली आहे. अमीरच्या चौकशीतून या प्रकरणामधील पुढील धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.
अटकेचा थरारक घटनाक्रम
अश्विनी दोन महिन्यांपूर्वीच टिटवाळा येथील घरात भाड्याने राहण्यास गेली होती. पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर कक्षाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल ढोले आणि पथकाने अश्विनीचा शोध सुरू केला. यावेळी दोन-दोन पोलिसांच्या पथकाने पालिका अधिकाऱ्यांच्या बहाण्याने सर्वेक्षण सुरू केलं. कुणालाही काही माहिती लागू न देता ते अश्विनीच्या घरापर्यंत पोहोचले. अश्विनीचे घर सापडल्याचा ग्रीन सिग्नल मिळताच पथकाने छापा टाकत झाडाझडती सुरू केली. या कारवाईने अश्विनीचा गोंधळ उडाला. मात्र, सुरुवातीला तिनेही आपण फक्त बार गर्ल असेपर्यंतची ओळख पुढे आणली. पोलिसांनी तिचे संपूर्ण घर पिंजून काढले, मात्र हाती काहीच लागले नाही. अखेरीस पोलिसांचे लक्ष कचऱ्याच्या डब्याकडे गेले. त्यांनी ते उघडताच हाती 6 कोटींचे ड्रग्ज लागल्याने अश्विनीचे बिंग फुटले.
कोर्टाचा खर्च भागवण्यासाठी ड्रग्ज विक्री
अमीर कोर्टात तारखेला हजर राहत नसल्याने डीआरआयच्या प्रकरणात फेब्रुवारीत त्याच्याविरुद्ध वारंट जारी केले होते. कारागृहात जाण्यापूर्वीच फेब्रुवारीमध्ये अमीरने या गोळ्या अश्विनीकडे देत पुढे विक्री करण्यास सांगितले. जेणेकरून त्या विकून अमीरचा पुढचा कोर्ट प्रकरणाचा खर्चही भागेल. अमीर आणि इरफानची ओळख कारागृहात असतानाच झाली. अमीरने यापूर्वीही मोठ्या प्रमाणात गोळ्या इरफानला विक्रीसाठी दिल्याचा संशय आहे. तेथेच अमीरला भेटायला येताना अश्विनीची इरफानसोबत ओळख झाली. त्यानुसार, अमीरचा ताबा घेत त्याला अटक केली.
पैसा आला कुठून? रुकसाना नावाने बनावट आधार कार्ड
एवढ्या मोठ्या किमतीचा साठा घेण्यासाठी किमान 1 कोटी रुपये अगाऊ दिल्याचा अंदाज आहे. मात्र, हे ड्रग्ज घेण्यासाठी पैसे कुठून आले? नेमका हा साठा किती आला होता? याच्या तपासासाठी अश्विनीच्या बँक खात्यासह मालमत्तांची माहिती काढण्यात येत आहे. बँक खात्यातील माहिती मिळताच पुढे ती रक्कम गोठविण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्वतःची ओळख लपविण्यासाठी अश्विनी बनावट नावाचाही वापर करत होती. यासाठी ती रुकसाना शेख नावाने आधार कार्ड वापरत असल्याचेही समोर आले.










