April 22, 2026 3:40 pm

अशोक खरातच्या छातीत कळ आली अन् पोलिसांची धावाधाव, कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स मागवली

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

दैवी अवता असल्याचे भासवून अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि आर्थिक फसवणूक करणारा भोंदूबाबा अशोक खरात याची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर येत आहे.अशोक खरात याची गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्त्वाखालील एसआयटी पथकाकडून (SIT) कसून चौकशी सुरु आहे. एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्या गुन्ह्यात त्याला पोलीस कोठडीत घेऊन एसआयटी दररोज अनेक तास खरात याची चौकशी करत आहे. मात्र, मंगळवारी एसआयटीकडून चौकशी सुरु असताना अशोक खरात याची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे.

अशोक खरात याला चौकशी सुरु असताना अचानक डोकेदुखी, मळमळ आणि उलटीचा त्रास सुरु झाला. यानंतर त्याच्या छातीत दुखायला लागल्याने त्याला तात्काळ ऑक्सिजन लावण्यात आला. अशोक खरात याच्यासाठी तात्काळ कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स बोलावून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. अशोक खरातला नेमका काय आणि कशामुळे त्रास झाला, याची नेमकी माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, अलीकडेच अशोक खरात याच्या वकिलांनी न्यायालयात एक महत्त्वाची मागणी केली होती. आरोपीच्या खांद्याचे ऑपरेशन झाले आहे, त्याचे डोकेही दुखत आहे. पेनकिलर गोळ्या, औषधांनी फारसा फरक पडत नाही. त्यामुळे अशोक खरात याला वैद्यकीय तपासणीवेळी न्यूरोसर्जनकडे घेऊन जावे, अशी मागणी खरातच्या वकिलांनी केली होती. यानंतर तीन दिवसांतच अशोक खरात याची प्रकृती बिघडल्याने या सगळ्यात काही काळंबेरं तर नाही ना, अशी शंकाही उपस्थित झाली आहे. अद्याप पोलिसांनी अशोक खरात याच्या प्रकृतीबाबत नेमकी माहिती दिलेली नाही.

अशोक खरात याच्याशी संबंधित असलेले डॉक्टर्स आणि अन्य व्यक्तींची एसआयटीकडून चौकशी केली जात आहे. आता खरात प्रकरणात नाशिकमधील एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची चौकशी करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. एसआयटीने तब्बल सहा तास या हॉटेल व्यावसायिकाची चौकशी केल्याचे समजते. त्याच्याकडून काही आर्थिक व्यवहारांबाबत माहिती घेण्यात आली. याशिवाय, अशोक खरात याच्याशी संबंध असलेले जमीन व्यवहार आणि इतर आर्थिक बाबींविषयी एसआयटीने या हॉटेल व्यावसायिकाला प्रश्न विचारले. सहा तासांच्या चौकशीनंतर मंगळवारी रात्री या हॉटेल व्यावसायिकाला उशीरा घरी सोडण्यात आले. अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत गुरुवारी संपणार आहे. त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाईल. यावेळी एसआयटी कोणती नवी माहिती सादर करुन पुन्हा अशोक खरातची पोलीस कोठडी मिळवणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

भोंदूबाबा अशोक खरात विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी उत्तर सोलापूर तालुक्यातील कळमण येथील शेतकरी राजाराम बनसोडे यांनी केली आहे. 11 एकर जमीन दीड कोटी रुपयांना घेण्याचे आश्वासन देऊन केवळ 50 लाख रुपये दिल्याचा शेतकरी बनसोडे यांचा आरोप आहे. खरात आणि त्यांच्या एजंटांनी पैसे देण्याचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा राजाराम बनसोडे यांचा आरोप आहे. या प्रकरणी कळमण येथील शेतकरी राजाराम बनसोडे यांनी सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते ऍड. योगेश पवार यांच्या माध्यमातून पोलिसांकडे तक्रारी अर्ज दिला आहे.

तक्रारीत केलेल्या दाव्यानुसार नोव्हेंबर 2021 मध्ये बनसोडे यांची 11 एकर जमीन दीड कोटी रुपयांना घेण्याचे ठरले होते. मात्र, केवळ 50 लाख रुपये देऊन जमिनीची खरेदी करण्यात आली आणि उर्वरित रक्कम मागितल्यास जादूटोणा करून संसार उद्ध्वस्त करण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात यांच्यासह अन्य 6 जणांवर फसवणूक आणि जादू टोणा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!