April 17, 2026 4:31 pm

*अपघातानंतर बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू; न्यायासाठी वैदू समाज रस्त्यावर

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

संगमनेर खुर्द येथील सुरज सूर्यभान शिंदे (वय – 36) या युवकाचा संशयास्पद मृत्यू हा अपघात की घातपात हा प्रश्न 36 तास उलटून गेल्यानंतरही अनुत्तरित आहे. गुरुवारी रात्री आठ ते साडे आठच्या सुमारास स्कुटीची धडक लागून एक व्यक्ती जखमी झाल्यानंतर सुरजला बेदम मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप समाज बांधवांनी केला आहे.

या मारहाणीतच सुरजचा मृत्यू झाल्याचा दावा करत न्यायासाठी वैदू समाज रस्त्यावर उतरला आहे. जोपर्यंत सुरजला न्याय मिळत नाही तोपर्यंत त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका समाज बांधव आणि कुटुंबियांनी घेतली आहे.

नाशिक येथून शवविच्छेदनानंतर शुक्रवारी सायंकाळी सुरजचा मृतदेह संगमनेर शहर पोलीस ठाण्यासमोर आणण्यात आला. यावेळी हजारोंच्या संख्येने समाजबांधव रात्रभर तिथेच ठिय्या देत न्यायाच्या प्रतीक्षेत उभे राहिले. एकीकडे तपासासाठी तीन दिवसाची मुदत मागत शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच रीतसर गुन्हा दाखल करण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असलेले पोलीस निरीक्षक समीर बारवकर, तर दुसरीकडे समाज न्यायाच्या भूमिकेवर ठाम, हेच या घटनेचे विदारक वास्तव ठरले. जोपर्यंत गुन्हा दाखल करून आरोपी अटक होत नाहीत, तोपर्यंत हा उद्रेक थांबणार नाही, असा थेट इशारा देण्यात आला आहे.

प्रशासनाने तात्काळ कारवाई न केल्यास पुणे-नाशिक महामार्गावर छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांसमोर सुरजचा मृतदेह ठेवून रास्ता रोको करण्याचा निर्धार समाजाने जाहीर केला आहे. एवढेच नव्हे तर बस स्थानकातून एकही बस बाहेर पडू दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. नाशिक, अकोले, श्रीरामपूर, पारनेर, कोपरगावसह 100 किलोमीटर परिसरातील गावांमधून हजारो कार्यकर्ते एकत्र जमणार असून, मुंबईहूनही कार्यकर्ते दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले. पोलीस प्रशासनाची भूमिका स्पष्ट झाली नाही किंवा न्याय मिळाला नाही, तर संगमनेरमध्ये तात्काळ रास्ता रोको करू तसेच न्याय मिळेपर्यंत हटणार नाही असा एकसंध निर्धार व्यक्त करण्यात आला.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!