शहरातील भाजप आमदार संजय केनेकर यांच्या कार्यालयात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी रात्री त्यांना भेटायला आलेल्या एका व्यक्तीच्या बॅगमध्ये घातक हत्यार सापडलं आहे.
हा प्रकार उघडकीस येताच एकच खळबळ उडाली आहे. ही माहिती समोर येताच राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे. आमदार केनेकर यांच्या घातपाताचा हा प्रयत्न होता का? अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. या घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून पुढील तपास सुरू आहे.
नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या वेळी आमदार संजय केनेकर यांना भेटण्यासाठी काही लोक त्यांच्या कार्यालयात आले होते. भेटीनंतर परत जाताना त्यापैकी एका व्यक्तीची आपली बॅग कार्यालयातच विसरली. काही वेळाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी ही बॅग तपासली असता, त्यामध्ये एक बंदूक आढळून आली. आमदारांच्या कार्यालयात अशा प्रकारे शस्त्र सापडल्याने एकच खळबळ उडाली. आता घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी संबंधित बॅग आणि बंदूक ताब्यात घेतली. या प्रकरणाबाबत माहिती देताना क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी सांगितले की, “आमदार केनेकर यांच्या कार्यालयात सापडलेली ती बंदूक ही ‘एअरगन’ आहे.” पोलिसांनी तातडीने तपास करत ती बॅग कोणाची होती, याचा शोध सुरू केला आहे.
घातपाताचा संशय आणि पोलिसांचा तपास
या घटनेमुळे केनेकर यांच्यासोबत काही घातपात घडवण्याचा कट रचला होता का? ती व्यक्ती कोण होती? ती एअरगन घेऊन का फिरत होती? आणि ती विसरण्यामागे काही विशिष्ट हेतू होता का? या सर्व बाजूंचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.











