डोंबिवली पूर्व ग प्रभाग हद्दीतील रेल्वे स्थानक भागातील रस्ते, गल्लीबोळ सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत गजबजलेले असतात. या भागातून चालणे नागरिकांना अवघड होत आहे. अशी परिस्थिती असताना ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त भारत पवार आणि या प्रभागाचे फेरीवाला हटाव पथकाचे पथक प्रमुख, कामगार या भागात फिरकत नसल्याने नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
शनिवारी सकाळापासून फेरीवाल्यांचा डाॅ. राॅथ रस्त्याला विळखा पडला आहे.
हे सर्व फेरीवाले मस्जिद बंदर, भायखळा, मुंब्रा, अंधेरी भागातील आहेत. त्याठिकाणाहून येऊन ते दररोज येथे व्यवसाय करतात. काही डोंबिवलीतील बेकायदा चाळीत गटाने राहतात.
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाजवळील डाॅ. राॅथ रस्ता, पाटकर रस्ता, उर्सेकरवाडी गल्लीतील रस्ता हे सर्वाधिक वर्दळीचे रस्ते आहेत. हे सर्व रस्ते सकाळी आठ ते रात्री ११ वाजेपर्यंत फेरीवाल्यांनी गजबजलेले असतात. डाॅ. राॅथ रस्त्याच्या सीमेंट काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हा रस्ता पाटकर रस्ता प्रवेशद्वार ते डाॅ. राॅथ रस्त्यावरील मधल्या जिन्यापर्यंत खोदून ठेवण्यात आला आहे. या खोदलेल्या रस्त्यावरून, पेव्हर ब्लाॅकचा ढिगाऱ्यावरून नागरिक या रस्त्यावरून येजा करतात.
फेरीवाला पथकाचे दुर्लक्ष
रेल्वे स्थानकापासून दीडशे मीटरच्या आत एकही फेरीवाला बसता कामा नये, असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहेत. तरीही पालिकेच्या डोंबिवलीतील ग प्रभाग हद्दीत सकाळी आठ ते रात्री ११ वाजेपर्यंत फेरीवाले डाॅ. राॅथ रस्ता, उर्सेकरवाडी गल्ली, रामनगर वाहतूक कार्यालय परिसरातील रस्ते, गल्लीबोळ अडवून व्यवसाय करतात.
डाॅ. राॅथ रस्ता काँक्रीट कामासाठी खोदून ठेवला आहे. या भागातून नागरिकांना चालणे अवघड होते. तरीही या खोदलेल्या रस्त्यावर फेरीवाले ठाण मांडून बसत आहेत. दररोज सकाळपासून फेरीवाले रस्ते, पदपथ अडवून व्यवसाय करत असताना ग प्रभागातचे साहाय्यक आयुक्त भारत पवार, या प्रभागाचे फेरीवाला हटाव पथक प्रमुख यांना हे फेरीवाले दिसत नाहीत का, असे प्रश्न नागरिक करत आहेत.
सीसीटीव्हीचे नियंत्रण
ग प्रभाग साहाय्यक आयुक्तांसमोरील पालिकेच्या स्मार्ट सिटी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून डाॅ. राॅथ रस्ता, रामनगर परिसर, उर्सेकरवाडी भागात फेरीवाले बसले आहेत की नाही हे स्पष्टपणे दिसते. एवढी सुविधा उपलब्ध असताना ग प्रभाग साहाय्यक आयुक्त पवार आणि या प्रभागाचे फेरीवाला नियंत्रण पथक या फेरीवाल्यांकडे दुर्लक्ष करत असल्याने आयुक्त अभिनव गोयल यांनी एक दिवस अचानक डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागात दौरा करून या फेरीवाल्यांना पाठबळ देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
माजी मंत्री अडकले
मागील तीन दिवसापूर्वी डाॅ. राॅथ रस्ता भागातील भाजप कार्यालयात एक व्याख्यानाचा कार्यक्रम होता. माजी मंत्री जगन्नाथ पाटील, उपमहापौर राहुल दामले, नगरसेवक शशिकांत कांबळे, ॲड. सौरभ ताम्हणकर, माजी नगरसेवक संदीप पुराणिक यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाला जाताना आणि सुटल्यानंतर या पदाधिकाऱ्यांना फेरीवाल्यांचे धक्केबुक्के, विळख्यातून बाहेर पडावे लागले. फेरीवाल्यांचा हा विळखा पाहून नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. याप्रकरणी आम्ही आयुक्तांकडे या फेरीवाल्यांना आशीर्वाद देणाऱ्या साहाय्यक आयुक्त, फेरीवाला हटाव पथक प्रमुख आणि पथकातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची मागणी करणार आहोत, असे ॲड. सौरभ ताम्हणकर यांनी सांगितले.











