ऐन फेब्रुवारी महिन्यातच डोंबिवली पश्चिमेला तीव्र पाणीटंचाईने ग्रासले आहे. प्रभाग क्रमांक २२ मधील सह्याद्रीनगर, राजूनगर, सरोवरनगर आणि महालक्ष्मी चौक परिसरात पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने व अपुरा होत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत पालिकेने मोफत किंवा सवलतीच्या दरात वाढीव टँकर द्यावेत, अशी मागणी जोर धरत आहे.
अनेक भागांत तासाभरापेक्षाही कमी वेळ पाणी येत आहे. पहाटेच्या वेळी पाणी येत असल्याने गृहिणींची मोठी ओढाताण होत आहे. महापालिकेचे टँकर अपुरे पडत असल्याने नागरिकांना खासगी टँकरसाठी दोन ते अडीच हजार रुपये मोजावे लागत आहेत. अमृत योजना रखडली असून राजूनगर व गरिबाचा वाडा येथील पाण्याच्या टाक्यांचे काम संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
पाणीपुरवठा विभागाकडे तक्रारींचा पाढा
माजी नगरसेवक प्रकाश भोईर यांनी पालिका आयुक्त अभिनव गोयल यांची भेट घेऊन या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. जोपर्यंत वितरण व्यवस्था सुधारत नाही, तोपर्यंत पालिकेने नियमितपणे टँकर पुरवठा करावा, असे निवेदनात म्हटले आहे. टाक्या बांधण्याचे काम कधी पूर्ण होणार आणि त्या पूर्ण झाल्यावर पाणी भरण्यासाठी जलवाहिन्यांचा आराखडा तयार आहे का, असा संतप्त सवाल रहिवासी विचारत आहेत.
या भागात टंचाई
डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्रमांक २२ मधील सह्याद्रीनगर, राजूनगर, सरोवरनगर, गरिबाचा वाडा, साईनगर, शंकेश्वरनगर तसेच महालक्ष्मी चौक परिसरात पाणीपुरवठा अत्यंत कमी दाबाने व अपुऱ्या वेळेस होत असल्याने नागरिकांना गंभीर पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.











