कधी शहरातील चौकात बसून भीक मागत होते. अनेकदा नागरिकांकडून अपमानस्पद वागणूकही मिळत होती. मात्र बदलण्याची जिद्द असेल तर गगनही ठेंगणे आहे, असे म्हटले जाते. महापालिकेने राबवलेल्या उपक्रमाला भिक्षेकरांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसाद ते आज समाजाच्या मुख्य प्रवाहात आले आहे. विशेष म्हणजे ते येत्या गणराज्यदिनी त्यांना विशेष आमंत्रित करण्यात आले असून दिल्लीतील राजपथावर बसून प्रजासत्ताक दिनाची परेड पाहणार आहेत.
महानगरपालिका व सह्याद्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार यांच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेला ‘आस्था भिक्षेकरी पुनर्वसन निवारा केंद्र’ हा उपक्रम समाजातील वंचित घटकांसाठी आशेचा किरण ठरत आहे. मनपा आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्या पुढ़ाकारातून व अतिरिक्त आयुक्त वैष्णवी बी. तसेच उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांच्या मार्गदर्शनाखाली २०२२ पासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत १३३० हून अधिक भिक्षेकऱ्यांचे बचाव, पुनर्वसन व समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनर्समावेशन करण्यात आले आहे. निवारा, आरोग्यसेवा, समुपदेशन, कौशल्य विकास व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना सन्मानाचे जीवन जगण्याची संधी देण्यात आली आहे.
तिघांची निवड
शहरातील तीन पुनर्वसित लाभार्थ्यांना २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिन कार्यक्रमास देशभरातून निवडलेल्या १०० विशेष आमंत्रितांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. यात ६१ वर्षीय शरीफ शेख, ५२ वर्षीय अनिल जुनघरे व ७० वर्षीय वृद्धा गायाबाई शुक्ला यांचा समावेश आहे. राष्ट्रीय पातळीवरील या महत्त्वाच्या कार्यक्रमात पुनर्वसित लाभार्थ्यांचा सहभाग हा शासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त प्रयत्नांचा यशस्वी परिणाम आहे. या लाभार्थ्यांसोबत कार्यालयीन वार्डन गौतम नागरे, व्यवस्थापक राकेश गाठे व्यवस्थापक व अधिक्षिका अनिता गंधर्वार उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रपती, पंतप्रधानांना देणारे भेटवस्तू
स्माइल आस्था उपक्रमाबाबत स्वयंलिखित पत्र व नागपुरातील झिरो माइलची प्रतिमा तसेच राष्ट्रपति व पंतप्रधान यांना त्यांचे छायाचित्र भेट स्वरूप देणार आहे. महानगरपालिका व सह्याद्री फाउंडेशन यांच्या वतीने सांगण्यात आले की, ‘आस्था’ व स्माइल उपक्रम हा भिक्षेकरीमुक्त, सर्वसमावेशक आणि सशक्त समाजनिर्मितीच्या भारत सरकारच्या दृष्टीकोनाशी सुसंगत आहे. पुनर्वसनाच्या माध्यमातून गरजू व्यक्तींना आत्मनिर्भर बनविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केल्या जात आहे.











