महिना एक लाख पगार, दिवसाला ८ ते १० तासांची ड्युटी, राहायला बंगला ज्यात स्विमिंग पूलही… नोकरीचा देश थायलंड. अशी स्वप्नवत नोकरी मिळाल्यामुळे हैदराबादच्या कट्टल गुडा गावातील मिर सज्जाद अली (वय २३) शहारून गेला होता. प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी नोकरी आपल्याला मिळाली, याचा त्याला खूप आनंद होता. बॅकाँकच्या एका आलिशान कॉल सेंटरमध्ये डिजिटल सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करण्यासाठी गेलेला मिर सज्जाद अली एका वेगळ्याच कचाट्यात अडकला.
मिर सज्जाद अली मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बॅकाँका पोहोचला. मात्र त्याला जे स्वप्न दाखविले गेले, त्याच्या अगदी उलट झाले. आलिशान कॉल सेंटरऐवजी त्याला एका घाणेरड्या आणि दाटीवाटीच्या खोलीत कोंबले गेले. जिथे त्याच्यासारख्या अनेक तरूणांना सायबर क्राइमसारखे गुन्हे करायला भाग पाडले जात होते. थायलंड-म्यानमारच्या सीमेवर असलेल्या एका कॉल सेंटरमधून हा गोरखधंदा चालत होता.
मिर सज्जादचे नातेवाईक सय्यद अली यांनी याबाबतची माहिती द इंडियन एक्सप्रेसला दिली. त्यांनी म्हटले, १६ जानेवारी रोजी मिर सज्जादचा फोन आला. मला इथून सोडवा, अशी गयावया तो करत होता. त्याच्यासह अनेक लोकांना एक कॉल सेंटरमध्ये डांबण्यात आले आहे. त्यांच्याकडून लोकांची डिजिटल फसवणूक करण्याचे काम केले जाते. जर हे काम करण्यास नकार दिला, तर त्यांना मारहाण केली जाते.
हैदराबादचे एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या प्रकरणी आवाज उचलल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. ओवेसी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून यात लक्ष घालण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “मला बॅकाँकमधून एक चिंताजनक संदेश मिळाला. जवळपास १६ भारतीय नागरिक ज्यात तीन हैदराबादच्या युवकांचा समावेश आहे. या सर्वांना थायलंडमध्ये चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून फसवून नेण्यात आले. तिथे गेल्यावर त्यांना थायलंड-म्यानमारच्या सीमेवर नेऊन सायबर गुलामी करण्यास भाग पाडले जात आहे.”
या तरूणांना दिवसाचे १८ ते २० तास काम करावे लागत आहे. त्यांच्यावर शारीरिक अत्याचार होत आहे. त्याचे पासपोर्ट, फोन जप्त करण्यात आले आहेत. त्यांच्या आरोग्याची हेळसांड होत असतानाही त्याकडे लक्ष दिले जात नाही, अशी या तरूणांची व्यथा ओवेसी यांनी मांडली.
मिर सज्जाद अलीचा चुलत भाऊ मेहदी अलीने द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, मिरने मला सांगितले की, थायलंडमधील रिक्रूटरने त्याला व्हिडीओ कॉल करून स्विमिंग पूल असलेला सुंदर व्हिला दाखवला होता. या ठिकाणी त्याला राहायचे असून कामाचे ठिकाणही छान असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे मिर सज्जादने लवकरात लवकर फ्लाईट पकडून बॅकाँकला येण्यास सांगितले. जर उशीर केला तर ही नोकरी दुसऱ्याला दिली जाईल, असेही त्याला सांगण्यात आले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधून अनेक तरूण या रॅकेटचे शिकार झाले आहेत. आंध्र प्रदेशच्या सीआयडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, थाई पोलिसांच्या मदतीने यापूर्वी काही भारतीय तरूणांची सोडवणूक करण्यात आली आहे. या तरूणांनी आपला धक्कादायक अनुभव कथन केला. त्यांना सायबर गुन्हेगारीचे रोजचे लक्ष्य देण्यात येत होते. जर त्यांचे लक्ष्य पूर्ण झाले नाही तर त्यांचा छळ केला जात असे. तसेच त्यांचा पासपोर्ट आणि फोनही जप्त केला जात होता.
नोव्हेंबर २०२५ मध्ये आंध्र प्रदेश सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने ३७० भारतीय नागरिकांची सुटका केली होती. यात एकट्या आंध्र प्रदेशमधील ५५ जणांचा समावेश होता.











