पुणे शहराला ड्रग्स आणि गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर काढणे हीच आपली सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे स्पष्ट करत पुणे पोलीस आयुक्त आयपीएस अमितेश कुमार यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून थेट मैदानात उतरून धडक कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. विशेषतः पुण्यातील तरुण पिढी अमली पदार्थांच्या आहारी जात असल्याचे गांभीर्य ओळखून त्यांनी ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले असून, हजारो कोटींच्या ड्रग रॅकेटवर घाव घालत तस्करांचे कंबरडे मोडले आहे.
ड्रग्सविरोधात निर्णायक लढा
अमली पदार्थांचा वाढता विळखा, ड्रग्समुळे भरकटणारी तरुणाई आणि त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी यामुळे पुण्याच्या प्रतिमेला तडा जात होता. ही परिस्थिती बदलण्यासाठी अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारताच ड्रग्सविरोधी विशेष मोहिमा, हॉटेल्स, पब्स, हुक्का पार्लरवर कडक निर्बंध, तसेच नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू केली. यामुळे पालकवर्गातून मोठ्या प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे.
गुन्हेगारांमध्ये दहशत, नागरिकांमध्ये विश्वास
शहरातील सराईत गुन्हेगार, टोळ्या आणि ड्रग तस्करांविरोधात थेट कारवाई करताना कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश आयुक्तांनी दिला. मोक्का (MCOCA) अंतर्गत कारवाई करत अनेक कुख्यात गुन्हेगारांवर वचक बसवण्यात आला. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती असो किंवा टोळी – “पुण्यात गुन्हा कराल तर सुटका नाही,” हा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
‘अमितेश पॅटर्न’ची चर्चा
पोर्शे कार अपघात प्रकरणापासून ते आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट उघडकीस आणण्यापर्यंत, अमितेश कुमार यांच्या कामगिरीमुळे ‘अमितेश पॅटर्न’ चर्चेत आला आहे. कायद्यापुढे सर्व समान आहेत, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले. कल्याणीनगर येथील पोर्शे अपघात प्रकरणात आरोपीला वाचवण्यासाठी झालेल्या यंत्रणात्मक गैरप्रकारांविरोधात त्यांनी घेतलेली ठाम भूमिका ऐतिहासिक मानली जात आहे. रक्ताचे नमुने बदलणारे डॉक्टर असोत किंवा कर्तव्यात कसूर करणारे पोलीस अधिकारी – कोणालाही माफी नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
मैदानात उतरून काम करणारे नेतृत्व
केवळ केबिनमध्ये बसून आदेश देणारे अधिकारी नव्हे, तर प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन काम करणारे, तपासावर लक्ष ठेवणारे आणि अधिनस्त अधिकाऱ्यांना बळ देणारे नेतृत्व म्हणून अमितेश कुमार यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे पुणे पोलिस दलाचा दरारा वाढला असून, शहर सुरक्षिततेच्या नव्या उंचीवर पोहोचत आहे.
पुणेकरांच्या मनात विश्वास
आज पुणेकरांच्या मनात “कुणी तरी ठामपणे शहरासाठी उभा आहे” हा विश्वास निर्माण झाला आहे. ड्रग्स, गुन्हेगारी आणि भ्रष्टाचाराविरोधात सुरू असलेली ही लढाई कायम राहणार असल्याचा निर्धार आयुक्त अमितेश कुमार यांनी व्यक्त केला असून, ड्रगमुक्त, सुरक्षित आणि कायद्याच्या अधीन असलेले पुणे घडवण्याचा त्यांचा संकल्प अधिक ठाम होताना दिसत आहे.











