प्रसिद्ध बॉलीवूड संगीतकार ए. आर. रहमान यांनी आठ वर्षांपासून आपल्याला अपेक्षेप्रमाणे काम मिळत नसल्याचा दावा केला होता. त्यामागे चित्रपटसृष्टीतील ‘सत्ताबदल’ आणि कदाचित ‘धार्मिक भेदभाव’ कारणीभूत असू शकतो, असे त्यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रहमान चर्चेत आले आहेत.
BBC Asian Network ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले होते, “गेल्या आठ वर्षांत सत्ताबदल झाला आणि आता जे लोक सर्जनशील (क्रिएटिव्ह) नाहीत, त्यांना निर्णय घेण्याची शक्ती मिळाली आहे. हा बदल स्पष्टपणे दिसत नाही; पण तो अप्रत्यक्ष पद्धतीने समजतो. कदाचित हे सांप्रदायिक कारणही असू शकते.”
रहमान यांच्या वक्तव्यांवर कंगना रणौत, जावेद अख्तर व गायक शान यांसारख्या अनेक कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, आता ज्येष्ठ गायक अनूप जलोटा यांनी या वादाबद्दल त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. तसेच रहमान यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारावा, असं विधानही त्यांनी केलं आहे.
तर पुन्हा हिंदू धर्म स्वीकारा : अनुप जलोटा
एका व्हिडीओत अनूप जलोटा यांनी आपलं मत मांडलं. ते म्हणाले, “ए. आर. रहमान आधी हिंदू होते. नंतर त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. त्यानंतर त्यांना भरपूर काम मिळालं, प्रसिद्धी मिळाली आणि लोकांचं प्रेमही मिळालं. पण जर त्यांना आजही असं वाटत असेल की, धर्मामुळे त्यांना काम मिळत नाही, तर त्यांनी पुन्हा हिंदू धर्म स्वीकारावा. त्यांनी असा विश्वास ठेवावा की, धर्म बदलल्यानंतर त्यांना पुन्हा काम मिळेल. त्यांच्या मुलाखतीतून मला हेच समजलं. त्यामुळे मी त्यांना पुन्हा हिंदू होण्याचा सल्ला देतो.”
या वादावर ए. आर. रहमान यांचे स्पष्टीकरण
टीकेनंतर ए. आर. रहमान यांनी एक व्हिडीओ करून आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “संगीत हे माझ्यासाठी नेहमी लोकांना जोडण्याचे, आनंद देण्याचे व संस्कृतीचा सन्मान राखण्याचे माध्यम राहिलं आहे. भारत माझी प्रेरणा आहे, माझा गुरू आहे आणि माझं घर आहे. माझ्या बोलण्याचा कधी कधी गैरसमज होऊ शकतो. पण, संगीताच्या माध्यमातून लोकांना सन्मान देणं आणि त्यांची सेवा करणं हाच माझा उद्देश आहे. माझा कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता.”
ते पुढे म्हणाले, ”भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. त्यामुळे मला स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करता येते आणि देशातील विविध संस्कृतींचा उत्सव संगीतातून साजरा करण्याची मला संधी मिळते. मी या देशाचा कायम ऋणी आहे. जय हिंद, जय हो.”
गेल्या आठ वर्षांत रहमान यांनी दिलेलं संगीत
गेल्या आठ वर्षांत ए. आर. रहमान यांनी अनेक मोठ्या चित्रपटांसाठी संगीत दिले आहे. त्यामध्ये मॉम (२०१७), 2.0 (२०१८), बिगिल (२०१९), दिल बेचारा (२०२०), पोन्नियिन सेल्वन भाग १ व २, अतरंगी रे (२०२१), मिली (२०२२), पिप्पा (२००३), ‘चमकीला’ व ‘तेरे इश्क में’ यां सिनेमांना संगीत दिले आहे. ‘अॅनिमल’साठीच्या संगीतातही त्यांनी इतर संगीतकारांसह योगदान दिले आहे. सध्या ते बॉलीवूडच्या बहुप्रतीक्षित अशा ‘रामायण’ या चित्रपटासाठी हान्स झिमर यांच्यासह काम करीत आहेत.











