April 23, 2026 5:00 pm

किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अर्जुन जाधव यांना पीएच.डी. प्रदान भौतिकशास्त्र शिक्षणातील संशोधनाला शिवाजी विद्यापीठाची मान्यता

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

वाई प्रतिनिधी : प्रशांत थोरवे

वाई : किसन वीर कनिष्ठ महाविद्यालय, वाई येथील उपप्राचार्य तथा अनुभवी प्राध्यापक प्रा. अर्जुन साहेबराव जाधव यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्याकडून शिक्षणशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. “उच्च माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र विषयातील अभिरूचीवृद्धी कार्यक्रमाचे विकसन” या विषयावरील त्यांचा संशोधन प्रबंध विद्यापीठाने नुकताच मंजूर केला आहे. हा संशोधन प्रबंध आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्या डॉ. वंदना नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आला. भौतिकशास्त्र हा विषय अनेक विद्यार्थ्यांना कठीण वाटतो, मात्र योग्य अध्यापन पद्धती, कृतीशील उपक्रम व अभिरुची निर्माण करणाऱ्या शैक्षणिक कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचा विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक कसा बदलता येतो, याचा सखोल अभ्यास या संशोधनातून करण्यात आला आहे. किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये यापूर्वी डॉ. विलास खंडाईत यांना पीएच.डी. मिळाल्यानंतर हा मान मिळवणारे प्रा. अर्जुन जाधव हे दुसरे प्राध्यापक ठरले आहेत.

त्यामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडली असून संशोधन क्षेत्रातही संस्थेचा नावलौकिक वाढला आहे. ३५ वर्षांहून अधिक काळ अध्यापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रा. जाधव यांनी भौतिकशास्त्र विषयाचे अध्यापन करत हजारो विद्यार्थ्यांना घडवले आहे. त्यांनी एम.एस्सी., एम.एड. असे उच्च शिक्षण घेतले असून एम.एस्सी. परीक्षेत शिवाजी विद्यापीठातून प्रथम क्रमांक (गोल्ड मेडल) पटकावण्याचा बहुमानही मिळवला आहे. परीक्षक, मुख्य परीक्षक, नियामक तसेच प्रश्नपत्रिका निर्माता म्हणून त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. संशोधनाची तीव्र इच्छा, चिकाटी आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या जोरावर वय व इतर अडथळ्यांवर मात करून त्यांनी ही पदवी प्राप्त केली असून, हे अनेक तरुण शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

त्यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार मकरंद आबा पाटील, राज्यसभेचे खासदार नितीन पाटील, जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार मदनदादा भोसले, सचिव डॉ. जे. एस. चौधरी, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. प्रा. अर्जुन जाधव यांच्या पीएच.डी. प्राप्तीमुळे किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाच्या शैक्षणिक परंपरेला नवे वैभव लाभले असून, भविष्यात त्यांच्या संशोधनाचा लाभ विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीस निश्चितच होईल, अशी भावना शिक्षणप्रेमी नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!