मुंबई:- कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणुकीदरम्यान पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपा आमने सामने आले आहेत. डोंबिवलीत मध्यरात्री भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. डोंबिवली पूर्वेतील तुकारामनगर परिसरात भाजप आणि हा राडा झाला. पैशांचं वाटप करण्यावरुन झालेल्या वादात कोयत्याने वार करण्यात आल्याचा आरोप आहे. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. ही घटना पॅनल क्रमांक 29 मधील प्रचाराच्या पार्श्वभूमीवर घडली असून, या पॅनलमध्ये भाजप आणि शिवसेना शिंदे गटात युती नसल्यामुळे दोन्ही पक्ष आमनेसामने आहेत.
भाजपाकडून कविता म्हात्रे, आर्या नाटेकर, मंदार टावरे, अलका म्हात्रे तर शिवसेना शिंदे गटाकडून रूपाली म्हात्रे, रंजना पाटील, नितीन पाटील आणि रवी पाटील हे उमेदवार रिंगणात आहेत. रविवारी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी भाजपा कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत एक महिला आणि तीन पुरुषांना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. मात्र, कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने सोमवारी रात्री पुन्हा वातावरण तापलं.
सोमवारी रात्री तुकारामनगर येथे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि कार्यकर्त्यांनी भाजपवर पैसे वाटपाचे आरोप करत गोंधळ घातला. याचदरम्यान जोरदार हाणामारी झाली. या घटनेत भाजपा उमेदवार आर्या नाटेकर यांचे पती ओमनाथ नाटेकर गंभीर जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांच्यासह आणखी दोन जण जखमी झाले आहेत. भाजप उमेदवार व जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी गंभीर आरोप करत सांगितलं की गणपतीच्या दर्शनाला गेले असताना शिवसेनेचे उमेदवार नितीन पाटील आणि रवी पाटील यांनी कोयत्याने हल्ला केला. त्याचवेळी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील यांनी हे आरोप फेटाळत प्रत्यारोप केले आहेत.
पैसे वाटप करत असताना आम्ही लोकांना पकडून पोलिसांना फोन केला. मारहाण आम्ही केली नाही, भाजप कार्यकर्त्यांनी दादागिरी केली. रवींद्र चव्हाण यांनी पक्षात येण्याचा दबाव टाकला, तो नाकारल्याचा राग आमच्यावर काढण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांनी अर्धा तास रस्त्यावर ठिय्या आंदोलन करत पोलिसांच्या निष्क्रियतेवर सवाल उपस्थित केले. यावेळी कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी घटनास्थळी येऊन उमेदवारांची समजूत काढली.
राजेश मोरे यांनी स्पष्ट इशारा देत सांगितलं की पैसे वाटप करणाऱ्यांवर उद्या पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली जाईल. कारवाई झाली नाही, तर रस्त्यावर उतरणार. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही गटांच्या तक्रारी नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असून तपास सुरू आहे. या सलग दोन दिवसांत झालेल्या घटनांमुळे कल्याण–डोंबिवली महापालिका निवडणूक प्रचाराला हिंसक वळण लागले असून परिसरात तीव्र तणाव निर्माण झाला आहे.











