पुणे, : एम्प्रेस बॉटनिकल गार्डन, पुणे यांच्या वतीने रविवार, १८ जानेवारी २०२६ रोजी बालकांसाठी चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रेसकोर्सजवळील एम्प्रेस बॉटनिकल गार्डन, पुणे – ४११००१ येथे होणार असून, या स्पर्धांसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही, अशी माहिती आयोजकांनी दिली.
चित्रकला स्पर्धा ५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी सकाळी १० ते १२ या वेळेत होणार आहे. स्पर्धेसाठी नोंदणी सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होईल. चित्रकलेचा विषय स्पर्धास्थळी दिला जाणार असून, कागद आयोजकांकडून पुरविण्यात येईल. मात्र सहभागी विद्यार्थ्यांनी स्वतःचा ड्रॉइंग बोर्ड व रंगसाहित्य सोबत आणणे आवश्यक आहे.
तसेच, हस्ताक्षर स्पर्धा दुपारी १२ ते १२.३० या वेळेत आयोजित करण्यात आली असून, त्यामध्ये ६ ते १५ वर्षे वयोगटातील मुले सहभागी होऊ शकतात. या स्पर्धेसाठी लेखन साहित्य व कागद आयोजकांकडून दिला जाणार असून, विद्यार्थ्यांनी लेखन फळी (रायटिंग बोर्ड) व पेन किंवा पेन्सिल स्वतः आणाव्यात.
ही स्पर्धा Friends of Botanical Garden, Pune यांच्या वतीने आयोजित करण्यात आली असून, मुलांमधील सर्जनशीलता, कल्पकता व सुंदर हस्ताक्षराला चालना देण्याच्या उद्देशाने पालकांनी आपल्या पाल्यांना मोठ्या संख्येने सहभागी करून घ्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.











