August 5, 2026 1:26 pm

पुण्यात खड्डेमुक्त रस्त्यांसाठी महाविकास आघाडीचे महापालिका सभेत जोरदार आंदोलन; काही काळ कामकाज ठप्प

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पुणे, प्रतिनिधी : शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून बुधवारी पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार आंदोलन केले. सभेच्या प्रारंभीच नगरसेवकांनी महापौरांच्या व्यासपीठासमोरील जागेत धाव घेत घोषणाबाजी केल्याने काही काळ सभागृहातील कामकाज ठप्प झाले.

पर्यावरण अहवाल सादर होण्यापूर्वी विरोधी पक्षनेते अॅड. नीलेश निकम, काँग्रेसचे गटनेते रामचंद्र कदम, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गटनेते काका चव्हाण तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गटनेते नितीन गावडे यांच्यासह महाविकास आघाडीतील नगरसेवकांनी आंदोलन सुरू केले.

“रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?”, “पुणेकरांना चांगले रस्ते मिळालेच पाहिजेत”, “खड्डेमुक्त पुणे झालेच पाहिजे” आणि “रस्ते आमच्या हक्काचे, नाही कोणाच्या बापाचे” अशा घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनाच्या कारभाराचा निषेध केला.

विरोधकांनी आरोप केला की, शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अपघात, वाहतूक कोंडी, वाहनांचे नुकसान आणि नागरिकांचा मनस्ताप वाढला आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

खड्ड्यांसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, शहरातील सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी आणि **’खड्डेमुक्त पुणे’**साठी कालबद्ध कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

आंदोलनामुळे काही काळ सभागृहातील कामकाज विस्कळीत झाले. त्यानंतर वातावरण शांत झाल्यावर नियमित कामकाजाला पुन्हा सुरुवात करण्यात आली. मात्र, शहरातील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा महापालिकेच्या सभागृहात ऐरणीवर आला असून, यावर तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!