August 5, 2026 12:54 pm

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन अल्पवयीन बहिणींवरील लैंगिक अत्याचार; ६५ वर्षीय आरोपी अटकेत, पॉक्सोसह ॲट्रॉसिटीचा गुन्हा

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

पिंपरी, दि. २९ जुलै : पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रमजान बागवान (वय ६५) याला वाकड पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पॉक्सो) कायदा, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलींचे कुटुंब आणि आरोपीचे कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करते. घटनेच्या दिवशी मुलींचे आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले असताना दोन्ही बहिणी घरी एकट्या होत्या. याच संधीचा गैरफायदा घेत आरोपीने मोठ्या मुलीला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे.

दरम्यान, मुलगी आरोपीच्या घराकडे जात असल्याचे शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या निदर्शनास आले. संशय आल्याने त्यांनी तातडीने मुलीच्या पालकांना माहिती दिली. पालकांनी मुलीकडे विचारपूस केल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला आणि वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली.

प्राथमिक तपासात आणखी गंभीर बाब समोर आली असून, मे २०२६ पासून आरोपीने मोठ्या मुलीवर चार वेळा आणि धाकट्या बहिणीवर एकदा लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. हा प्रकार कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रार दाखल होताच वाकड पोलिसांनी तत्काळ कारवाई करून पीडित मुलींची वैद्यकीय तपासणी केली आणि आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपासासाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, पीडित कुटुंबाची ओळख गोपनीय ठेवत आवश्यक कायदेशीर व वैद्यकीय मदत उपलब्ध करून दिली जात आहे.

याबाबत परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त प्रदीप जाधव यांनी सांगितले की, आरोपीविरुद्ध पॉक्सो आणि ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येत असून, भक्कम पुराव्यांच्या आधारे न्यायालयात दोषारोप सिद्ध करण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करणार आहेत.

दरम्यान, या घटनेमुळे बालसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, अल्पवयीन मुलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये जलद तपास, प्रभावी खटला आणि दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!