गेल्या काही दिवसांपासून इनामवस्ती, काळेवाडी आणि परिसरात बिबट मादीचा मुक्त संचार सुरू होता. वारंवार होणारे दर्शन, पाळीव जनावरांवर होणारे हल्ले तसेच शेतात काम करणाऱ्या शेतकरी व नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण पसरले होते. विशेषतः सकाळी आणि सायंकाळच्या वेळी नागरिकांनी घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगण्यास सुरुवात केली होती. अनेकांनी वनविभागाकडे तक्रारी करत बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती.
स्थानिकांच्या वाढत्या तक्रारींची गंभीर दखल घेत घोडेगाव वनविभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या. वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनकर्मचाऱ्यांनी २१ जुलै रोजी या परिसरात रणनीतीपूर्वक पिंजरा उभारला. त्यानंतर बिबट्याच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत होते.
मंगळवारी (दि. २८ जुलै) मध्यरात्रीनंतर शिकारीच्या शोधात आलेली बिबट मादी पहाटे सुमारे ३ वाजता पिंजऱ्यात अडकली. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर व त्यांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. आवश्यक ती खबरदारी घेत बिबट मादीची तपासणी करण्यात आली.
वनविभागाच्या माहितीनुसार, जेरबंद करण्यात आलेली बिबट मादी अंदाजे ९ वर्षांची असून तिची प्रकृती पूर्णपणे सदृढ आहे. वैद्यकीय तपासणीनंतर तिला पुढील निगा व संरक्षणासाठी जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात सुरक्षितपणे हलविण्यात आले आहे.
या यशस्वी कारवाईमुळे इनामवस्ती, काळेवाडी तसेच आसपासच्या गावांतील नागरिकांनी वनविभागाचे आभार मानले आहेत. परिसरातील भीतीचे वातावरण कमी झाले असून शेतकरी व ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी कुणाल लिमकर यांनी नागरिकांना आवाहन केले की, वन्यप्राण्यांचे दर्शन झाल्यास घाबरून न जाता अथवा त्यांचा पाठलाग न करता तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. वन्यजीवांच्या सुरक्षिततेसोबतच नागरिकांच्या सुरक्षेलाही वनविभाग सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.











